Chinchwad News : सोने खरेदीच्या बहाण्याने बनावट पेमेंट ॲपद्वारे 25 सराफांना गंडा घालणा-या स्मार्ट आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – सोने खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन अर्धा ते एक तोळा सोने घेऊन त्याचे पैसे ऑनलाईन पाठवत असल्याचे सांगून बनावट पेमेंट ॲपद्वारे सराफांना गंडा घालणा-या स्मार्ट आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. या आरोपीने युट्युबवर व्हिडीओ पाहून एक ॲप्लिकेशन डाउनलोड केले होते. त्यातून तो पैसे पाठवल्याचे सराफ दुकानदारांना दाखवत होता.

निखिल सुधीर जैन (वय 22, रा. उंड्री पुणे. मूळ रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी निखिल याने त्याला काही कामधंदा नसल्याने पैसे मिळवण्यासाठी नवीन युक्ती युट्युबवर शोधली. त्यात त्याला बनावट पेमेंट अॅपबाबत माहिती मिळाली. त्यातून त्याने एक नामी युक्ती शोधली. तो पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सराफी दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने जात असे. दुकानातून अर्धा तोळा ते एक तोळा सोने खरेदी करत असे. सहसा तो सोन्याचा कॉइन अथवा सोन्याची अंगठी घेत असे.

पैसे देण्याच्या वेळी त्याच्याकडे असलेल्या बनावट ॲप्लिकेशनमधून तो पेमेंट केल्याचा बनाव करत असे. पेमेंटसाठी दुकानातील क्युआर कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट पाठवले असल्याचे दुकानातील कामगार व दुकानदारांना दाखवत असे. मात्र बनवत अॅप्लिकेशन मधून पेमेंट पाठवले जात नसत. सुरुवातीला सराफ दुकानदारांना याचा संशय येत नसे. कारण पेमेंट झाल्यानंतर काही वेळाने देखील बँकेचे मेसेज येतात. त्यामुळे दुकानदार सेफ साईड म्हणून ग्राहकाचा फोन क्रमांक लिहून घेतात.

चिंचवड येथील एका सराफाच्या दुकानातून आरोपीने एक सोन्याचे नाणे खरेदी केले. त्याच्या ठरलेल्या पॅटर्नप्रमाणे त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचे दुकानदाराला दाखवले. मात्र ठराविक वेळेनंतर पैसे खात्यावर न आल्याने दुकानदाराने ग्राहकाला फोन केला. मात्र फोन बंद लागला. त्यानंतर दुकानदाराने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे गुंडा विरोधी पथक करत होते. गुंडा विरोधी पथकाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील तब्बल 274 सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासले. त्यात पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला उंड्री पुणे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी निखिल याने चिंचवड येथील दुकानदारासह पिंपरी-चिंचवड शहरातील सहा, पुणे शहरातील 17 आणि पुणे ग्रामीण मधील दोन सराफ दुकानदारांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून 105 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण पाच लाख 77 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी गुंड विरोधी पथकाशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, सुनील चौधरी, विजय तेलेवार, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.