Chinchwad News: पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रिपाइंच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा

माझ्यावर देहुरोड येथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे.' असे म्हणून आरोपीने त्याच्या हातातील बाटली तोंडाला लाऊन त्यातील औषध पिले.

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्तालयात फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या रिपाइंच्या माजी पदाधिका-यावर चिंचवड पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित माणिक छाजेड (रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या पदाधिका-याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या पिंपरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई कल्याणी तुकाराम गाडवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास आरोपी अमित छाजेड पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष शाखेच्या कार्यालयासमोर समोर आला. आरोपी मोठमोठ्याने ओरडत म्हणाला की, माझ्यावर देहुरोड येथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे.’ असे म्हणून आरोपीने त्याच्या हातातील बाटली तोंडाला लाऊन त्यातील औषध पिले. औषध पिल्यानंतर आरोपीने बाटली पोलिसांच्या दिशेने फेकून दिली.

विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पाटील यांनी आरोपीकडे जाऊन त्याची विचारपूस केली असता आरोपीने सांगितले की, माझ्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी आत्महत्या करण्यासाठी फिनेल प्यायलो आहे.’

त्यानंतर आरोपीने खाली पडून उलट्या केल्या. पोलिसांनी त्याला प्रथम तालेरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्या पदाधिका-यावर भारतीय दंड विधान कलम 309 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा

देहूरोड येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनय महावीर बारलोटा (वय 33, रा. लेखाफार्म, देहूरोड) यांनी अमित माणिक छाजेड (रा. पोर्टरचाळ, देहूरोड) याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बारलोटा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी याने देहूरोड बाजारपेठेत झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण सुरु केले होते. त्याचे उपोषण मागे घेण्यासाठी देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून फिर्यादी बारलोटा यांच्याकडे आरोपीने दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील आरोपीने फिर्यादी यांना दिली.

आरोपीने सुरुवातीला सवाना चौकात फिर्यादी यांना देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने भेटायला बोलावले. फिर्यादी भेटायला गेले असता ‘मला सर्व व्यापारी संघटनेकडून दोन लाख रुपये द्या. नाहीतर मी तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करीन’ अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने 27 ऑगस्ट रोजी पुन्हा फिर्यादी यांना फोन करून दोन लाखांची मागणी केली. यामध्ये देहूरोड परिसरातील 17 व्यापारी आहेत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.