शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Chinchwad news : बेशिस्त खासगी ट्रॅव्हल्स बसवरील कारवाईबाबत परिवहन मंत्र्यांचे जुजबी उत्तर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समुळे
अन्य वाहनांना व वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकत्याच झालेल्या राज्य अधिवेशनात कपात सूचनेद्वारे वाचा फोडली होती. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयातील वायुवेग पथकामार्फत नियमित कारवाई करण्यात येते, एवढेच जुजबी उत्तर दिले. 

दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बेशिस्त वाहनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत परिवहन मंत्रालयाकडून कोणतेच ठोस उत्तर न मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांची निराशा झाली आहे.

तसेच मंत्री परब यांनी दिलेल्या उत्तरात वाहनांवरील कारवाईची जुजबी आकडेवारी दिली आहे. शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर चाप लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत राज्याच्या परिवहन मंत्रालयाने कोणतेच ठोस उत्तर न दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची निराशा झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे आणि वाहनांना अडथळा ठरेल, अशा पद्धतीने खासगी ट्रॅव्हल्स बस उभे केल्या जातात. ट्रॅव्हल्स चालकांची मक्तेदारी दिवसेंदिवस वाढली आहे. नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी ग्राऊंड, भोसरी, निगडी, चिंचवड स्टेशन, अहिंसा चौक, काळेवाडी चौकात रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाड्यांनी व्यापलेला असतो.

शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस थांबविल्या जातात. शहरातील वर्दळीचे रस्ते, उपनगरातील रस्ते तसेच अनेक अंतर्गत रस्त्यावर खासगी आणि अवजड प्रवसी बसेस मुक्तपणे संचार करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि इतर वाहनांना अडथळा होऊन अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

शहर व परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झालेली आहे. मंगल कार्यालये, सभागृह, मॉल मल्टिप्लेक्ससमोर वाहने रस्त्यावर अनधिकृतपणे उभी केली जातात. रस्त्यांवरील अशा नियमबाह्य पार्किंगने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शहरवासीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या आदेशाने स्थानिक पोलिसांनी शहरात ठराविक वेळेत ट्रॅव्हल्स आणि अवजड वाहनांवर बंदी घातली होती. काही ठिकाणी अशा वाहनांवर सायंकाळी निर्बंध घालण्यात आले होते. तसेच त्या वाहनांचे थांबे आणि पार्किंग यावरही नियंत्रण आणण्यात आले होते. परंतु कालांतराने पोलिसांच्या वाहतूक विभागाने ही कार्यवाही गुंडाळण्यात आली आहे. शहराच्या वाहतूक कोंडीवर सोयीस्कर व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

शहरातील महामार्ग अथवा मोकळ्या जागेत खासगी बसच्या पार्किंगची सोय करण्याची आवश्यकता आहे. असुरक्षित वाहतूक व बेशिस्त पार्किंग यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. तसेच लोकप्रतिनिधींकडून वाहतूक प्रश्नांवर बोलाविलेल्या अनेक बैठकांना वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त परस्पर गैरहजर राहून शहरातील वाहतूक समस्येबाबत अनास्था दाखविली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीबाबत राज्य सरकारकडून तातडीची उपाययोजना व काय कार्यवाही केली जात आहे, याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात कपात सूचनेद्वारे विचारणा केली होती.

त्याला परिवहन मंत्री अनिल परब यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नियमित कारवाई करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

मात्र, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बेशिस्त वाहनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत परिवहन मंत्रालयाकडून कोणतेच ठोस उत्तर न मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांची निराशा झाली आहे.

spot_img
Latest news
Related news