Chinchwad : शहर स्मार्ट होण्यासाठी सांस्कृतिक केंद्रांचा विकास गरजेचा – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी नियोजन, तंत्रज्ञान आणि नागरिक या त्रिसूत्रीवर काम करावे लागणार आहे. त्यातच शहरातील लोप पावणा-या संस्कृतीचा विकास झाल्यास शहर अधिक वेगाने स्मार्ट होईल. म्हणून स्मार्ट सिटीसाठी सांस्कृतिक केंद्रांचा विकास होणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवड शहरात इंद्रायणी, मुळा आणि पवना या तीन नद्यांच्या किनारी वसलेलं शहर आहे. त्यामुळे नद्यांची स्वच्छता आणि त्यांचा विकास करणं ही देखील काळाची गरज आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

प्रशासन, राजकीय नेतेमंडळी आणि नागरिक यांच्यामध्ये दिवसेंदिवस दरी पडत चालली आहे. ही दरी कमी करण्यासाठी नागरिकांनी योग्य नेत्यांची निवड करून त्यांच्याकडून प्रशासनाच्या मदतीने कामे करून घ्यायला हवीत. शहराच्या सुधारणेत नागरिकांचा सहभाग वाढायला हवा. एकविसावे शतक हे शहरीकरणाचे शतक आहे. या शतकात सुमारे 80 टक्के जनता शहरात वास्तव्यास येणार आहे. त्याचा देखील विचार स्मार्ट शहराच्या आराखड्यात व्हायला हवा. शहराच्या विकासाचं प्लॅनिंग नागरिकांसोबत बसून त्यांच्याशी चर्चा करून करायला हवं. त्यातून नागरिकांच्या नवीन संकल्पना पुढे येतील आणि त्या संकल्पना राबविताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. सध्या चार भिंतींमध्ये शहराच्या विकासाचं नियोजन केलं जात असल्याने अनेक समस्या तयार होत आहेत.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक शाळा महाविद्यालये आली आहेत. यापुढेही येत राहतील. शिक्षणाच्या बाबतीत पुणे शहराला पर्याय म्हणून पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिले जात आहे. त्यात शिक्षण घेण्यासाठी भारतासह जगभरातून विद्यार्थी शहरात येत आहेत. अनेक लहान मोठे उद्योग शहरात येत आहेत. त्याबरोबर वाढणा-या लोकसंख्येचा विचार करून शहरातील सार्वजनिक ठिकाणे निर्माण करून त्यांचा विकास केल्यास नागरिकांचा मुक्त संचार शहरात होऊ शकेल. यामुळे काही रोजगार देखील निर्माण होतील. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी अंतर्गत विचार करीत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली तर अनेक समस्या कमी होतील. नागरिकांनी कचरा वर्गीकरण, वाहतुकीच्या नियमांचे पालन, वीज-पाणी यांची बचत आणि नियोजनपूर्वक वापर यावर भर द्यायला हवा. पिंपरी चिंचवड शहराला तीन नद्यांची नैसर्गिक देणगी मिळाली आहे. नद्यांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. अनेक संस्था त्यासाठी काम करत आहेत. नागरिकांचा त्यामध्ये सहभाग वाढायला हवा. प्रशासनासोबत चर्चा आणि काम करण्यासाठी सर्व हेवेदावे बाजूला ठेऊन नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक व्यासपीठांवर पुढं यायला हवं. यातून उत्तम स्मार्ट सिटी तयार होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.