Pune : पुणे शहर पोलिसांची 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना 

एमपीसी न्यूज – मुंबईमध्ये 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना आज सोमवारी (दि.26) पुण्यातील सारसबाग येथे सकाळी साडेआठ वाजता मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह मोठ्या संख्येने पुणेकर एकत्रित आले होते.

यावेळी शहिद शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम दिला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहिदांना चित्ररूपी श्रद्धांजली अर्पण केली.शहर पोलीस पश्चिम विभाग आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे सारसबाग येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी पुणे पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे,अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, प्रदिप देशपांडे, सुनील फुलारी, उपायुक्त सुषमा चव्हाण, माजी पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखऱ दैठणकर, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सुहाचे बावचे, प्रकाश गायकवाड, शिरीष सरदेशपांडे, अशोक मोराळे, तेजस्वी सातपुते, तसेच सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ट्रस्टचे इतर कार्यकर्ते, सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे हे 6 वर्ष होते. तसेच आज भारतीय संविधान दिनामुळे भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन देखील करण्यात आले.

यावेळी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, पुणे शहर हे भारताच्या संरक्षण श्रेत्रात आणि सर्वांगीण प्रगतीमध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे  मुंबईमधील 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आम्ही पुढे आहोत.मुंबईमधील 26/11ला झालेल्या हल्ल्यानंतर आपण अधिक सक्षम झालो आहोत. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.