Pimpri News : राज्य सरकारने परवानगी देऊनही शहरातील सिनेमागृह बंदच

Cinema halls in the city remain closed despite the state government's permission.

एमपीसी न्यूज – राज्यातील सिनेमागृह 50 टक्के क्षमतेसह पाच नोव्हेंबरपासून सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र, पाच दिवस उलटूनही पिंपरी चिंचवड शहरातील सिनेमागृह अजूनही बंदच आहेत. ऐन दिवाळीत सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही सिनेमागृह सुरू झाली नसल्याने सिनेमा रसिकांचा हिरमोड होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी देशातील व राज्यातील सिनेमागृह बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली व विविध आस्थापना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

केंद्र सरकारने फार पूर्वीच सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी दिली होती मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्यात ती परवानगी नाकारली होती. मात्र, मिशन बिगिन अंतर्गत राज्यातील सिनेमागृह 50 टक्के क्षमतेसह पाच नोव्हेंबरपासून सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. असे असले तरी अजूनही सुरू झाली नाहीत.

पीव्हीआर, आयनाॅक्स, कार्निवल सिनेमा यासारखी मोठी थिअटर्स अजून बंदच आहेत. वरिष्ठ व्यवस्थानाने याबाबत कोणतीही सूचना अजून दिली नसल्याचे या सिनेमागृहाचे व्यवस्थापक सांगत आहेत.

सरकारच्या निर्णयानुसार सर्व व्यवस्था सुरू करण्यात आली असून वरिष्ठ व्यवस्थानाचा होकार मिळताच त्वरीत सुरू होतील. दरम्यान, येत्या आठवडाभरात सर्व सिनेमागृह सुरळीत सुरू होतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

ओटीटी प्लॅटफॉर्म वरती बरेच सिनेमे प्रदर्शित होत आहेत मात्र, सिनेमागृहात सिनेमा पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो त्यामुळे सिनेमागृह लवकरात लवकर सुरू व्हावी अशी इच्छा सिनेमा रसिक व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.