CM addressing people : मास्क न लावणारा एक पॉझिटिव्ह माणूस चारशे जणांना संक्रमित करु शकतो – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – एक पॉझिटिव्ह व्यक्ती गर्दीत मास्क न लावता फिरला तर त्यामुळे चारशे जण संक्रमित होऊ शकतात. त्यानंतर ते 400 जण किती जणांना संक्रमित करु शकतील, याचा विचार तुम्हीच करा, त्यामुळे मास्क लावला नाही तर कारवाई केली जाणारच, असा स्पष्ट इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

कोरोना आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच नागरिकांच्या काही गोष्टींवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, कोरोना गेला आहे असं कुणीही समजू नये, त्यावर लस आलेली नाही त्यामुळे मास्क हेच आपलं शस्त्र आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, पाश्चिमात्य देशातील कोरोना संक्रमणाची उदाहरण देत राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

“ब्रिटन, इटली, स्पेनमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू झाला आहे. नेदरलॅण्डमध्ये घरातल्या घरात मास्क सक्ती केली आहे. याकडे जर बघितलं, तर मी म्हणेन ही लाट नाही, तर त्सुनामी आहे. आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. डॉक्टर, पोलीस लढतायेत. ते कुणासाठी लढतायेत,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शंभर वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूनं एक कोटी लोक मरण पावली होती. आता लोकसंख्या किती आहे, त्याच प्रमाण काय होईल? मी घाबरवत नाहीये, पण सर्तक राहण्यासाठी सूचना देतोय. जरी आपण सगळ्या गोष्टी उघडत आहोत. कारण आयुष्य पूर्वपदावर आलं पाहिजे. अर्थचक्राला गती देतो आहोत. पण गती देताना वेडीवाकडी गती देण्याचा प्रयत्न केला, तर ते दुर्गती होईल. गतीच्याऐवजी अधोगती होईल. पुन्हा जर का लॉकडाउन करण्याची वेळ आली तर तो आपल्याला भारी पडेल. रुग्णसंख्या वाढली आहे. सुविधा वाढल्या आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. सरकारनं बेड वाढवले, पण फक्त बेड वाढवून होणार नाहीत. कारण डॉक्टर आणि आरोग्यसेवक आणायचे कुठून? उद्या जर दुप्पट तिप्पट लाट आली, तर त्रैधातिरिपीट उडू शकते. ती येऊ न देणं हे आपण करू शकता,” असं ठाकरे म्हणाले.

“मी सध्या बघतोय की, मुंबई आणि बाहेर सुद्धा मास्क न घालणारी माणसं जास्त दिसायला लागली आहेत. हे अजिबात नाही चालणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण हळूवार सुरू करतो आहोत. पण, मास्क घातला नाही, तर त्याला दंड केला जाणार आहे. मी जी आकडेवारी सांगितली, ती माझी नाहीये. डॉक्टरांशी बोलून तुम्हाला सांगतोय. एक कोरोना पॉझिटिव्ह नागरिक मास्क न घालता गर्दीत फिरला, तर कमीत कमी 400 जणांना तो संक्रमित करू शकतो. मग 400 रुग्ण किती जणांना संक्रमित करतील? समाजासाठी आपल्याला या गोष्टीची खबरदारी घ्यावीच लागेल. स्पॅनिश फ्लूच्या वेळीही हीच त्रिसुत्री होती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी मी लादणार नाही. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी नक्की साजरा केला पाहिजे मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा. फटाक्यांवर बंदी घालायची का? ती जरुर घालता येईल पण ती घालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच दिवाळीलाही करा. घरात, इमारतीला रोषणाई करा. दिवे लावा, फटाकेही वाजवा पण मर्यादित स्वरुपात वाजवा, असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. फटाक्यांवर बंदी घातलेली नाही. मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवू नका आणि मर्यादित स्वरुपात फटाके वाजवा असंही त्यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या काळात आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आपण सगळेच काहीसे तणावमुक्त आहोत. मात्र दुसऱ्या लाटेची चिंता माझ्या मनात आहे. दुसरी लाट येऊ नये यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा चढता आलेख आपण जिद्दीने खाली आणला आहे. काही लोक म्हणत होते की परिस्थिती यांच्या हाताबाहेर चालली आहे मात्र त्यांना उत्तर मिळालं आहे. दिल्लीत तर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. प्रदुषणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काळजी घ्यायची आहे.

मेट्रोसाठी जर्मन कंपनीकडून कर्ज

“मुंबईच्या कारशेडचा विषय वेगळा आहे. सर्वांना एक सांगावसं वाटत आहे. जर्मनीच्या एका बँकेकडून आपण 45 दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे. आम्हाला महाराष्ट्र सोयीस्कर वाटतं असं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे राज्यातील जनतेच्या मेहनतीचे फळ आहे. हे आपल्या जनतेचं सरकार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

रेल्वेसाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

महिलांसाठी आपण लोकल सेवा सुरू केल्या आहेत. सर्वांसाठी लोकल सुरू करण्यावर केंद्राशी चर्चा सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील उत्तम सहकार्य करत असल्याचंही त्यानी सांगितलं. तसंच लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना मुंबई मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून, प्रकल्पात मीठाचा खडा टाकू नका, टीकेची पर्वा न करता काम करणार असल्याचा टोलाही विरोधकांना लगावला. “मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत.

विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.