Pune News : मुख्यमंत्र्यांकडून चांदणी चौकाची पाहणी,युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आश्वासन

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकले होते.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रविवारी या परिसरात पुन्हा भेट देत चांदणी चौकातील कामाची पाहणी केली.तसेच या ठिकाणी युद्ध पातळीवर काम पूर्ण केले जाईल,पूल तोडण्याची काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी 100 ट्रॅफिक वॉर्डन नेमले जातील आणि जड वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्रपणे उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सोमवारपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.येथील सर्विस रोड एकमेकांना जोडले जातील आणि अधिक लेन वाहनांसाठी सुरू केल्या जातील.प्रशासनाने ही आधी नागरिकांना दिलासा द्यावा आणि त्यानंतर हद्द पहावी अशा सूचना त्यांनी दिल्याचे सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे या कामाची पाहणी करत असतानाच मुंबईकडून येणाऱ्या एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.दोन दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले, परवा दिवशी या ठिकाणी मी साताराकडे जात होतो.त्यावेळी काही प्रवासी मला या ठिकाणी भेटले.त्यांनी येथील वाहतुकीच्या कोंडीची माहिती दिली.त्याचवेळी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि महामार्गाचे अधिकारी या सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला.त्यानंतर रविवारी या संपूर्ण विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली.

मात्र चांदणी चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमची टीम काम करत आहे.वाहतूक कोंडीत अडकलेल्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती सर्व तयारी संबंधित विभागाने केली आहे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.