Pune News : गणेश मंडळांना देखाव्याच्या उंचीबाबत पोलिसांच्या सूचना

एमपीसी न्यूज – अवघ्या दोन दिवसांनी लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे.लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी ही जय्यत तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे या उत्सवावर कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. त्यानंतर आता पुणे महापालिकेने गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही वैभवशाली असते.अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या या मिरवणुकीसाठी, रथाच्या देखाव्याच्या उंचीबाबत पोलिसांनी आणि प्रशासनाने काही सूचना जारी केल्या आहेत. 

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रोच्या पुलामुळे आणि छत्रपती संभाजी पूल या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे मंडळांनी देखावे आणि रथाच्या उंची व रुंदीबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.संभाजी पुलावरून जाणाऱ्या गणेश मंडळांनी रथाची देखाव्यासह 18 फूट उंची ठेवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शहरातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोडवरून गणेश विसर्जन मिरवणूक निघून संभाजी पुलावरून विसर्जन घाटाकडे जाते.संभाजी पुलाची उंची 21 फूट आहे.त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या देखाव्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विसर्जन मिरवणुकीत रथासह देखाव्याची कमाल उंची ही 18 फूट ठेवावी, असे आवाहन डेक्कन पोलिसांनी केले आहे.

याशिवाय कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्टेशन येथे मेट्रो स्टेशनची उंची 18 फूट आहे, नळस्टॉप येथील मेट्रो ओव्हर ब्रिजची उंची 17 फूट आहे. तर मेट्रो ओव्हर ब्रिजच्या लगत असणाऱ्या सर्विस रस्त्याची रुंदी 15 फूट आहे.त्यामुळे कर्वे रस्त्याने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांनी त्यांच्या विसर्जन रथांची देखाव्यासह कमाल उंची 16 फूट उंची आणि बारा फूट रुंदी ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.