Pimpri : पुन्हा कॉंग्रेसच सत्तेवर येणार –  सोनल पटेल

एमपीसी न्यूज –  कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या भ्रष्‍ट कारभाराचा संसदेत तसेच संसदेबाहेर पर्दाफाश केला आहे. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्‍या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत देशाच्या प्रधानसेवकामध्ये नाही. देशभर जनतेला भेडसावणा-या प्रश्नांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष खोटी माहिती देत आहेत. मात्र, कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जुमलेबाज सरकारच्या कामाची माहिती गल्‍ली, मोहल्‍ला, ब्‍लॉकस्तरावर जाऊन नागरिकांना द्यावी. पुढील वर्षात होणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सुज्ञ मतदार प्रधानसेवकाला गुजरातला पाठवतील, असा विश्वास अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी व्यक्‍त केला.
पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी तळवडे (निघोजे, दि. 22 ऑक्टो. 18) येथे सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप पटेल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, शिबिराचे प्रशिक्षक आमदार रामहरी रुपनवर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्‍ते सचिन सावंत, प्रदेश सरचिटणीस डॉ. रत्नाकर महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कविचंद भाट, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, पुणे मनपाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक विष्णुपंत नेवाळे, महिला कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस बिंदु तिवारी, सेवादल शहराध्यक्ष मकर यादव आदी उपस्थित होते.
पटेल म्‍हणाल्या की, या प्रशिक्षण शिबिरातून कार्यकर्त्यांना देशासमोर असलेल्या आर्थिक, औद्योगिक, कृषी क्षेत्रातील प्रश्नांची माहिती देण्यात आली. भाजपा सरकारने सर्वसामान्यांना कशा भूलथापा दिल्‍या. त्‍यांच्या सर्व योजना असफल ठरल्‍या याची माहिती नागरिकांना देण्यास कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे. नोटाबंदी, जीएसटी यामुळे आर्थिक विकास थांबला आहे. मोदी आणि शहांच्या हुकुमशाहीमुळे भांडवलदारांना पाठबळ मिळत आहे. त्‍यामुळे अर्थव्यवस्‍था डळमळीत होवून रोजगार कमी झाला असल्‍याचा आरोप सोनल पटेल यांनी केला.

तत्पूर्वी, प्रथम सत्रात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्‍हणाले, मोदी-शहांच्या हुकूशाहीला कंटाळून देशभरातील भाजपाचे आमदार, खासदार कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत. मोदी लाट ओसरल्‍याची ही चिन्हं आहेत. नागपुरचे आमदार आशिष देशमुख, खासदार नाना पटोले यांचा कॉंग्रेस प्रवेश ही सुरूवात आहे. शिवसेनेला फटकारताना पाटील म्‍हणाले की, शिवसेनेच्या नेत्‍यांमध्ये हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे भाषणात देण्याऐवजी आपली आक्रमक भूमिका कृतीतून दाखवावी. जाहिरातबाजीत फसलेले फडणवीस सरकार निष्क्रीय ठरले असल्‍याचे ‘जलयुक्‍त शिवार’ प्रकरणातून महाराष्ट्रातील शेतक-याला दिसले आहे. शेतक-यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव फक्‍त कागदावरच राहिला आहे.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे म्‍हणाले की, कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी यांनी तळागाळात काम करणा-या कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे. राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम या प्रश्नांचे काय झाले, याची उत्तरे सर्वसामान्य नागरिकांना सरकारने दिली पाहिजेत. 1994 मध्ये युती सरकारने 40 लाख घरे बांधू, 25 लाख नोक-या देऊ, एन्‍रॉन समुद्रात बुडवू अशा वल्‍गना केल्‍या होत्या. प्रत्यक्षात भाजपा-शिवसेनेचे सरकार एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाही. त्‍यामुळे त्‍यांना जनतेने घरी बसवले. आताही अशीच परिस्थिती असून, या निवडणुकीत जनता कॉंग्रेसच्या मागे खंबिरपणे उभी राहिल, असे साठे यांनी सांगितले.
या शिबिरास आजी-माजी आमदार, विविध सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश बोराटे यांनी तर आभार रमेश बागवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.