Chikhali : महापालिकेच्या अभियंत्यासह ठेकेदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्यावरून जाणारा एक युवक अंगावर डांबर पडून जखमी झाला. ही घटना दीड महिन्यांपूर्वी चिखली परिसरात घडली. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत बुधवारी (दि. 21)पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य अभियंत्यासह ठेकेदारावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन उध्दव शिंदे (वय 34, रा. यशवंत कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य अभियंता शहाजी गायकवाड आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन शिंदे यांचा गॅरेजचा व्यवसाय असून ते 6 ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या गॅरेजकडे दुचाकीवर जात होते. दरम्यान, चिखलीतील साने चौकात महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होते. कामगार रस्त्यावर डांबर टाकत असताना डांबर सचिन शिंदे यांच्या मानेवर उडाले. त्यामध्ये शिंदे जखमी झाले. त्याठिकाणी पालिकेचे अभियंते शहाजी गायकवाड उपस्थित होते. अभियंते गायकवाड आणि संबंधित काम करणा-या ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षिततेची कसलीही काळजी घेतली नाही. त्यामुळे शिंदे यांनी त्यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.