Bhimashankar : भीमशंकर ज्योतिर्लिंगावरून आसाम आणि महाराष्ट्रात वाद; अध्यात्मिक वारसा पळविण्याचा भाजपचा घाट???

एमपीसी न्यूज : पुण्यातील भीमाशंकर हे (Bhimashankar) सहावे ज्योतिर्लिंग म्हणून प्राचीन काळापासून प्रचलित आहे. परंतु, आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या भौगोलिक स्थानाबाबत वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे भाजपवर धार्मिक भावनांशी छेडछाड केल्याचा आरोप आता राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे.

आसाम सरकारने 14 फेब्रुवारी रोजी भारतातील सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रात याला विरोध होत आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथेच  आहे. गेले वर्षानुवर्षे संपूर्ण भारतात पुण्यातील भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याचे प्रचलित आहे.

परंतु, हिंदू मान्यतेनुसार एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी 3 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, औरंगाबादमधील घृष्णेश्वर आणि पुण्यातील भीमाशंकर हे एकूण सहावे ज्योतिर्लिंग आहे.

पुण्यातील सह्याद्री पर्वतावर असलेले सहावे ज्योतिर्लिंग हे केवळ महाराष्ट्रात आहे, असे अनेकांचे मत आहे. पण आसाममधील गुवाहाटीजवळील ज्योतिर्लिंग हे भीमशंकर ज्योतिर्लिंग असल्याचा दावा अचानक करण्यात आळा आहे. त्यामुळे आता आसाम सरकारच्या जाहिरातीवरून राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.

यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवत म्हंटले आहे, की भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना ट्विटमध्ये टॅग करून (Bhimashankar) आक्षेप घेतला आहे. आदि शंकराचार्यांच्या बृहद रत्नाकर स्तोत्राचा संदर्भ देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आसामचे भाजप सरकार जे काही करत आहे त्याला कोणताही आधार नाही आणि ते मान्य केले जाऊ शकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.