Bhosari News : एका अपत्यावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज – एका अपत्यावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून वात्सल्य हॉस्पिटल, लांडेवाडी येथे रविवारी (दि.11) हा कार्यक्रम पार पडला. डॉ. रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे होते, तर प्रमुख अतिथी पद्मश्री नारायण सुर्वे, व साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे होते. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुदाम मोरे, लायन्स क्लब भोजापूर अध्यक्ष सुरेखा साबळे उपस्थित होते.

यावेळी डॉ. रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते हेमलता व मोहन साबळे, दीप्ती व आनंद कुलकर्णी, शारदा व लीलाचंद पाटील या दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. रोहिदास आल्हाट म्हणाले, ‘आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटींवर जाऊन पोहचली आहे. लोकसंख्या आधिक असल्याने भूक, बेकारी, दारिद्रय, उपासमार, रोगराई यासारख्या असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. कुटूंब कल्याण अभियानात महिलांचा आधिकाधिक सहभाग असणे आणि त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने स्रियांनी कॉपर टी चा वापर, पुरुषांनी निरोधचा वापर करणे आवश्यक आहे.’

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे विभाग प्रमुख राजेंद्र वाघ यांनी ‘हम दो हमारा एक’ हे घोषवाक्य न राहता कृतीशील कार्यक्रम व्हावा अशा भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. सदाफुले म्हणाले, ‘कुटुंब नियोजन करण्यासाठी आयुष्यभर काम केलेले पहिले डॉ. रघुनाथ कर्वे यांचा आदर्श घेऊन संस्था जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षांपासून हा राष्ट्रीय कुटूंब कल्याण उपक्रम राबवित आहे.’ दिगंबर ढोकले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.