पुणे: बुधवारपासून अर्ध्या तासात कळणार कोरोना पॉझिटिव्ह

COVID-19 test results now available in 30 minutes.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतर्फे तब्बल 1 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या किटमुळे टेस्ट करून कोरोना पॉझिटिव्ह केवळ अर्ध्या तासात कळणार आहे.

येत्या बुधवारपासून ही तपासणी करण्यात येणार आहे. किट वापरण्या संबंधीचे प्रशिक्षण महापालिकेच्या डॉक्टर आणि स्टाफला देण्यात आले आहे. या किटला ‘आयसीएमआर’ ने मान्यता दिली आहे.

कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट भागात या किटचा वापर करण्यात येणार आहे. हृदयरोग, किडनी, मधुमेह, उच्चरक्तदाब, फुफ्फुस, कर्करोग, एचआयव्ही बाधित रुग्णांच्या तातडीच्या तपासणीसाठी हे किट वापरले जाणार आहे.

केवळ अर्ध्या तासात कोरोना रुग्ण सापडल्याने महापालिकेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांना घरीच विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात कपात होणार आहे.

कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करणे सोपे होणार आहे. यापुढे जेष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांची घरीच टेस्ट करण्यात येणार आहे. तर, कोरोनाचे निदान तातडीने व्हावे, यासाठी १ लाख अँटीजेन किट्स खरेदी करण्यात येणार आहे.

त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली आहे. एकूण साडे सात कोटी रुपये खर्च होणार आहे.

जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या होणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने उपचार करून मृत्यू रोखता येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.