Pimpri : बहुउद्देशीय प्रकल्पाचा आराखडा तयार करा; कामगार मंत्री डॉ. खाडे यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – जागा हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणा-या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी आज (सोमवारी) राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केली. या भूखंडावर उभारण्यात येणा-या बहुउद्देशीय प्रकल्पाबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश डॉ. खाडे यांनी यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रशासनाला दिले.

Pune : गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांना वीजजोडणी सेवेसाठी महावितरण सज्ज

या पाहणी दौ-यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मुंबई येथील कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुण्याचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, राजेंद्र शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, उप अभियंता सुभाष काळे, सहाय्यक नगररचनाकार अक्षय कुंभार, सर्व्हेअर घनश्याम गवळी, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसवे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर केशव घोळवे, तुषार हिंगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, नामदेव ढाके, अमित गोरखे, अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध भूखंडासंदर्भात महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये जागा हस्तांतरणाच्या बाबत करारनामे झालेले आहेत. यातीलच पिंपरी मधील मोरवाडी अजमेरा येथील भूखंड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास देण्यासंदर्भात कार्यवाही प्रस्तावित आहे.

या भूखंडावर कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार कल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत कामगार कल्याण मंत्री डॉ. खाडे यांनी या जागेची पाहणी केली.

या जागेवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत विविध सूचना डॉ. खाडे यांनी कामगार मंडळ प्रशासनाला केल्या तसेच जागा हस्तांतरणाच्या सद्यस्थितीबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये झालेल्या करारनाम्या संदर्भात तसेच जागा हस्तांतरणाबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे तसेच भूमी व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी कामगार मंत्री डॉ. खाडे यांना सविस्तर माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.