Dance Event : जागतिक नृत्य दिनानिमित्त गुरुवारी नृत्यतेज अकादमीचा ऑनलाईन नृत्य महोत्सव

एमपीसी न्यूज – जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्यतेज अकादमी तर्फे ऑनलाईन नृत्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि.29) सायंकाळी 5 वाजता महोत्सवाचे फेसबुक लाईव्ह व युट्यूब वरून प्रासारण केलं जाईल. शास्त्रीय, लोकनृत्य, सिनेनृत्य तसेच पश्चिमात्य नृत्याची आवड असलेल्या सर्वांना या ऑनलाईन शिबिराचा लाभ घेता येईल.

नृत्य प्रशिक्षणात तेजश्री अडिगे यांच्यासोबत राष्ट्रीय पारितोषिक विजेती मनाली कानिटकर व डान्स महाराष्ट्र डान्स या रिॲलिटी शोचा विजेता पुण्यकर उपाध्ये यांच्यासह 60 कलाकार सहभागी होणार असल्याचे तेजश्री अडिगे यांनी सांगितले.

तेजश्री अडिगे संचलित नृत्यकलामंदिर तर्फे गेली 25 वर्षे राष्ट्रिय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. बऱ्याच जणांना शास्त्रीय नृत्याचे सातत्याने प्रशिक्षण घेता येत नाही पण त्यांची नृत्याची आवड जोपासणे तसेच, अभिनय व मॉडेलिंग या क्षेत्रात सर्व वयोगटातील बाल, युवा व महिला कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 2003 मध्ये नृत्यतेज अकादमीची स्थापना करण्यात आली. अकादमीच्या माध्यमातून विविध नृत्य शिबिरांचे आयोजन केले जाते, यामध्ये लोकनृत्य, सिनेनृत्य, पश्चिमात्य नृत्य यांचे प्रशिक्षण देण्यात येते.

याचाच एक भाग म्हणून 21 ते 27 एप्रिल 2021 दरम्यान 18 वर्ष खालील व वरील महिलांसाठी नृत्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ज्येष्ठ नृत्यदिगदर्शिका दिवंगत सरोज खान यांना समर्पित व अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित केलेल्या नृत्यांचे प्रशिक्षण पार पडले. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात घरातील महिला खुश असेल तर सर्व कुटुंब खुश राहते या उद्देशाने हा उपक्रम राबविला होता. देश-विदेशातील 35 ते 40 विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.

यावर्षीच्या शिबिराचे उद्घाटन ऑनलाईन पध्दतीने पार पडले. यावेळी नृत्यकला मंदिराचे माजी विद्यार्थी व आज सिनेसृष्टीत प्रख्यात असलेले मयुरेश पेम, मानमित पेम यांनी खास उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या. तसेच, तेजश्री अडिगे यांच्या शिष्या व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्यदिगदर्शिका म्हणून काम केलेल्या सुप्रिया धाइंजे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

नृत्यतेज अकादमीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यापासून उत्कृष्ट बाल, युवा व नृत्यप्रशिक्षक पुरस्कार कलाकारांना देण्यास सुरवात केली.

यावर्षी नृत्यकला मंदिर ही संस्था 25 वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्त दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या नावे नृत्य व अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना अश्विनी पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून, अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांना यावर्षीचा अश्विनी पुरस्कार दिला जाणार आहे.

याशिवाय सुपर डान्सर पर्व चौथे यामध्ये निवड झालेल्या पाच वर्षीय सृष्टी कनोजिया हिला ‘बाल पुरस्कार’ दिला जाणार आहे. टेलिव्हिजन व सिने कलाकार सुपर्णा खर्डे यांना ‘युवा पुरस्कार’ तर, योगेश देशमुख यांना ‘उत्कृष्ट नृत्यप्रशिक्षक’ म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे. तसेच, नृत्य दिनाचे औचित्य साधून गरजू नृत्य कलाकार प्रमिला शिंदे यांना नृत्य कला मंदिर तर्फे रोख अकरा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे असे, तेजश्री अडिगे यांनी सांगितले.

प्रमोद एकबोटे, विवेक इनामदार, मयुरेश पेम, नंदकिशोर कपोते, स्वाती दैठणकार, मीरा जोशी यांनी पुरस्कार समितीचे काम पाहिले. नृत्य महोत्सवाच्या आयोजनात दीपक पागे, उमा पाटील, अमृता काकडे व ऋतुजा देशशेट्टी यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.