Dehugaon News: श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिवर्तन संस्था, रयत प्रबोधनीचे मुख्य प्रवर्तक, वारकरी दर्पणचे संपादक, युवा कीर्तनकार सचिन पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच देशभक्तीपर गीते गायली.

याप्रसंगी प्रा.डॉ.वसंतराव गावडे, देहूचे माजी सरपंच मधुकर कंद, ॲड. संजय भसे, माजी उपसरपंच गुलाब काळोखे, माजी उपसरपंच सचिन साळुंखे, सागर मोरे, नारायण पचपिंड, विजय ठाणगे तसेच सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, सदस्य प्रशांत काळोखे आदी मान्यवरांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

आपला भारत देश खूप छान आहे. सुंदर आहे. विविधतेने नटलेला आहे. ‘सभी का खून हे सामील यहा के मिठी मे’ … आदिवासी, दलित, शेतकरी यांच्यासह अठरापगड जातींचा व विविध धर्मीयांचा हा आपला देश आहे आणि हा देश उभा राहण्यात या सर्वांचे फार मोठे योगदान आहे. परंतु सध्या अनेक शाळांमधून एक विशिष्ट प्रकारचा इतिहास शिकविला जात आहे. त्यामुळे माणूस म्हणून, भारतीय म्हणून आपल्या सर्वांचा पराभव होतो की काय अशी खंत व्यक्त करीत संविधानाची नैतिकता जपत भारतीयत्व रुजविणे हीच सध्याच्या काळात देशाच्या हिताचे ठरेल असे ठाम प्रतिपादन सचिन महाराज पवार यांनी याप्रसंगी केले. फक्त धर्म आपण घेत बसलो आणि भारतीयत्व दुय्यम लेखले तर आपल्या हातून धर्मही जाईल आणि आपला पाकिस्तान झाल्या शिवाय राहणार नाही यासाठी प्राथमिक स्तरावरच शाळांमधून भारतीयत्व रुजविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या पिढीला पूर्वजांकडून हे स्वातंत्र्य आयते मिळाले आहे, म्हणूनच हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे, वाढवणे, वृद्धिंगत करणे, त्याचा दर्जा वाढविणे यावर काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देशाला जर मोठे बनवायचे असेल तर दोनच क्षेत्रात सध्या काम करणे गरजेचे आहे. एक आरोग्याचे क्षेत्र व दुसरे शैक्षणिक क्षेत्र. धार्मिक आंधळेपणा सोडून नवीन तंत्रज्ञान व विज्ञानाची सांगड घालत संविधानाची नीतिमत्ता जपली गेली पाहिजे. हा देश सर्वांचा आहे व सर्वांच्या योगदानातून उभा राहिला आहे… हे शाळांमधून सांगितले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना एक माणूस म्हणून… एक भारतीय म्हणून पुढे न्यायचे आहे असे त्यांनी सांगून मुलांमध्ये चांगले नेतृत्व गुण घडविण्याची सद्भावना व्यक्त केली.

यावेळी इ.पहिलीतील भावेश खोसे याने ए वतन …. हे देशभक्तिपर गीत सादर केले. इ. तिसरीतील प्रणाली बनकर हिने प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली. इ. तिसरीतील आरोही मारणे हिने माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल याचे चित्र मांडले. इ.पहिलीतील अर्णव रणखंबे याने आपल्या बोबड्या व निरागस बोलीत देशाबद्दल प्रेम व्यक्त केले. इ.दुसरी व तिसरीतील विद्यार्थ्यांनी झेंडागीत म्हटले. शाळेच्या प्राचार्या डाॅ.कविता अय्यर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका सौ.प्राची पोटावळे व सौ. योगिता नांगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. पाठक यांनी आभारप्रदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.