Pimpri News: महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी गॅझेट उपलब्ध करून द्या – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही अत्यंत गरीब कुटुंबातील असून हातावर पोट असणारे नागरिक आपल्या मुलांना पालिका शाळेत शिक्षण देतात. परिस्थिती हलाकीची असल्याने या पाल्यांचे पालक टॅब / गॅझेट किंवा ॲन्ड्रॉइड मोबाईल अशी साधने घेऊ शकत नाहीत.

पालकांची हिच गैरसोय लक्षात घेऊन महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापराकरिता व ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी गॅझेट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे. त्यात आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे की, राज्यात मार्च 2020 पासून कोरोना (COVID-19) संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. ई-लर्निग तसेच ऑनलाईन शिक्षण ही काळजी गरज झाली आहे. शिक्षक आणि मुले देखील या नवीन शिक्षण पद्धतीला आवडीने आत्मसाद करून, आपल्या दैनदिन जीवनाचा भाग बनवू पाहत आहेत. याकरिता आवश्यक असणाऱ्या प्रकारच्या जसे संगणक, मोबाईल, टॅब किंवा गॅझेट अशा प्रकारच्या डिजिटल साहित्याचा वापर करण्यात मुले पारंगत झाली आहेत.

सध्य स्थितीतील कोविड 19 सदृष परिस्थिती विचारात घेता व तसेच पुन्हा इतर राज्यामध्ये व देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. म्हणून नजीकच्या काळात इयत्ता 1 ते 10 वीच्या शाळेतील महापालिका अंतर्गत येणा-या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थांना तसेच शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना सन 2021-22 या वर्षात ऑनलाईन /ऑफलाईन शिक्षण देण्याकरिता अद्यावत तंत्रज्ञान असलेले नवीन प्रचलित आवृतीचे टॅब खरेदी करून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावणे गरजेचे आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणप्रणाली वापरण्याकरिता टॅब अथवा गॅझेट उपलब्ध करून देण्यासाठी शासन नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.