Wakad News : संरक्षण दलात असल्याचे सांगत रक्त तपासणीच्या बहाण्याने पॅथॉलॉजी लॅब चालक महिलेला 45 हजारांचा गंडा

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – संरक्षण दलात कार्यरत असल्याचे सांगून तसा विश्वास संपादन करून अनोळखी व्यक्तीने वाकड येथील पॅथॉलॉजी लॅब चालक महिलेला रक्त तपासणी करण्याचा बहाणा करून ऑनलाईन माध्यमातून 45 हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 7 मे 2021 रोजी घडला असून याबाबत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने बुधवारी (दि. 26) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8574072182 या क्रमांकावरून बोलणारा अभिषेक गुप्ता असे नाव सांगणा-या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लियो डायग्नोस्टिक नावाने पॅथॉलॉजी लॅब आहे. त्यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर फोन करून तो संरक्षण दलात कार्यरत असून तो सध्या पुणे विमानतळ येथे आहे. तिथे सहा जणांची रक्ताची चाचणी करायची असल्याची विनंती फोनवरील व्यक्तीने केली. फिर्यादी यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये असे एकूण 18 हजार रुपये होतील असे सांगितले.

त्यानंतर आरोपीने नऊ हजार पाठवणार असल्याचे सांगून त्याचे सीआयएसएफचे ओळखपत्र पाठवून तो संरक्षण दलात कामाला असल्याबाबत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या गुगल पे क्रमांकावर पाच रुपये पाठवले. ते पैसे आले का, याची खात्री करण्यासाठी त्याने फोन करून फोन चालू असताना फिर्यादी यांच्या बँक खात्यातून प्रथम नऊ हजार रुपये आणि नंतर 36 हजार रुपये असे एकूण 45 हजार रुपये काढून घेतले.

याबाबत फिर्यादी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे 24 जानेवारी रोजी आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.