Dehuroad : पाच सराईतांकडून 29 मोबाईल फोन जप्त; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – पाच सराईत चोरट्यांकडून 1 लाख 32 हजार रुपये किमतीचे 29 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली.

मयूर सुनील महाजन (वय 19, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), अविनाश प्रकाश लोखंडे (वय 20, रा. विष्णू समुद्रे चाळ, विठ्ठलवाडी, देहूगाव), बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (वय 31, रा. साई मंदिरामागे, वेणूनगर, वाकड. मूळ रा. समतानगर, परळीवेस, ता. अंबाजोगाई, ता. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गस्त घालत असताना पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना माहिती मिळाली की, देहूरोड शितळानगर मधील शितळादेवी मंदिराजवळ दोन इसम चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून मयूर महाजन आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले. तसेच विठ्ठलवाडी देहूगाव येथील पेट्रोलपंपाजवळून अविनाश लोखंडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी विविध कंपन्यांचे 28 मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. हे मोबाईल फोन त्यांनी देहूरोड परिसरातून मागील वर्षभरात चोरले आहेत.

दुस-या एका कारवाईमध्ये पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना माहिती मिळाली की, एक मोबाईल चोर अंबाजोगाई येथे आहे. त्यानुसार त्याला त्याच्या मूळ गाव अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोटो कंपनीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण 1 लाख 32 हजार रुपये किमतीचे 29 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन आणि जबरी चोरीचे दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य मोबाईल मालकांचा शोध घेणे सुरु आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रवीण दळे, फारूक मुल्ला, मयूर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदीप ठाकरे, राहुल खारगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.