Dehuroad Crime News : मोक्काच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर दहशत माजवून खंडणी मागणाऱ्या एकाला अटक

याबाबत एकाच आरोपीवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्याने तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून सूड बुद्धीने घरात घुसून जबरदस्तीने पैसे चोरले. तसेच एका दुकानात घुसून शिवीगाळ, मारहाण आणि तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (दि. 28) घडली. यातील आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे.

सागर हनुमंत शिंगाडे (वय 28, रा शिवशंभो सोसायटी, आदर्शनगर, किवळे, देहूरोड)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सिंधू हनुमंत घाडगे (वय 60, रा. माळवाले नगर एक, आदर्शनगर) यांनी गुरुवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी सागर आणि फिर्यादी यांचा मुलगा विशाल यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते.

आरोपी सागर नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला आहे. पूर्वीच्या भांडणाचा सूड घेण्यासाठी आरोपी फिर्यादी यांच्या घरात आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच घरातील कपाटातून 15 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

दुसऱ्या प्रकरणात सनी उर्फ रचित राजेंद्र केसरवनी (वय 22, रा. यमुनानगर, निगडी) यांनी गुरुवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, फिर्यादी यांचे मुकाई चौक, किवळे येथे राजश्री लॉटरी सेंटर आहे. त्या दुकानात गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता फिर्यादी सनी आणि त्यांचा मित्र बसले होते.

त्यावेळी आरोपी सागर दुकानात आला. त्याने दहा हजार रुपये खंडणी मागून हातातील दांडक्याने पायावर मारून सनी यांना जखमी केले. तसेच सनी यांच्या खिशातून 400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

त्यानंतर आरोपीने सनी यांच्या दुकानाच्या बाजूला असलेले दुकानदार भास्कर जाधव यांना देखील दहा हजार रुपयांची खंडणी मारून दुकानातील साहित्याची तोडफोड केली. शिवीगाळ, दमदाटी करून आरोपींनी परिसरात दहशत माजवली.

या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस करीत होते.

पोलीस कर्मचारी सावन राठोड यांना माहिती मिळाली की, सागर हनुमंत शिंगाडे हा देहूरोड सोडुन पळुन जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सागरला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

आरोपी सागरवर यापूर्वी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. तो मोक्काच्या गुन्हयामध्ये जानेवारी 2020 मध्ये जामिनावर सुटला होता. सागर याला पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यम पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, सावन राठोड, मयुर वाडकर, श्यामसुंदर गुट्टे, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, संदिप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, नितीन बहिरट, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.