Dehuroad crime News : रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी दोन डॉक्टरांना 10 वर्षांचा कारावास, 5 लाखांचा दंड

एमपीसी न्यूज – डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिला रुग्णाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. 2012 साली घडलेल्या या प्रकरणाचा निकाल नुकताच सुनावण्यात आला असून संबंधित दोन डॉक्टरांना 10 वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

डॉ. जितेंद्र सुरेश शिंपी आणि डॉ. सचिन हरी देशपांडे अशी शिक्षा झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी अनिल जगताप (वय 32) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

अनिल यांची पत्नी राजश्री जगताप (वय 21) असे मृत्यू झालेल्या रुग्ण महिलेचे नाव आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.  आर. जगदाळे यांनी हा निकाल दिला असून सरकारी वकील म्हणून राजेश कावेडीया यांनी काम पाहिले आहे.

अनिल जगताप रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतात. 2012 साली त्यांच्या पत्नी राजश्री यांना प्रसूतीसाठी आरोपी डॉ. शिंपी याच्या किवळे येथील अथश्री हॉस्पिटल अँड आशा नर्सिंग होम या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रसूतीसह त्यांचे कुटुंब नियोजनाचे देखील ऑपरेशन करायचे होते.

प्रसूती दरम्यान राजश्री यांची प्रकृती खालावली. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना सिझेरियनद्वारे मुलगी झाली.

राजश्री यांच्या मृत्यूबाबत अनिल यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. न्यायालयाने डॉ. जितेंद्र शिंपी आणि डॉ. सचिन देशपांडे यांनी दोषी ठरवत 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तसेच प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. या प्रकरणात भुलतज्ञ डॉ. विजय अगरवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आठ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.