Dehuroad : राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अश्लील भाषेमध्ये लेखन केले जात असून ते फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जात आहे. या प्रकारावर तातडीने आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे यांनी दिला आहे.

याबाबत देहूरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सागर शिंदे नावाचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अश्लील भाषेमध्ये लेखन करून फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. फेसबुकवर त्याचे ३ अकाउंट असून एक पेज आहे.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वातावरण शांत ठेवणे आवश्यक आहे. तरी काही विचित्र मनोवृत्तीचे तरुण वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारावर त्वरित आळा घालावा व कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऍड. कृष्णा दाभोळे यांनी दिला आहे.

यावेळी महिला अध्यक्षा शीतल हगवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष सचिन भुम्बक, समीर सत्तेलु, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शंकर स्वामी, कैलास गोडवे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.