Dehuroad : मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या तिघांकडून आठ मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी मोटारसायकल चोरायची. चोरलेली मोटारसायकल वापरण्याचा कंटाळा आला की ती मोटारसायकल आहे त्या जागेवर सोडायची आणि नंतर दुसरी मोटारसायकल चोरायची. असा सपाटा लावलेल्या तीन चोरांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीच्या आठ मोटारसायकल जप्त केल्या.

अक्षय राजू शेळके (वय 23, रा. सोमाटणे फाटा, मावळ), कार्तिक लक्ष्मण आढे (वय 19, रा. सोमाटणे फाटा, मावळ), सनी मनोज रॉय (वय 19, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार सादिक शेख (रा. मामुर्डी) अद्याप फरार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणा-या वाहन चोरीचा तपास करत होते. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संकेत घारे आणि किशोर परदेशी यांना माहिती मिळाली की, चार तरुण देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करत आहेत. चोरलेल्या मोटारसायकलचा वापर मौजमजेसाठी करायचा. मोटारसायकल वापरण्याचा कंटाळा आल्यास ती मोटारसायकल आहे त्या जागी सोडायची आणि नंतर दुसरी मोटारसायकल चोरी करायची. असा दिनक्रम या चोरट्यांना सुरु आहे.

त्यानुसार, पोलिसांनी चोरट्यांचा माग घेत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिघांनी त्यांच्या एका साथीदारासह मिळून देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी केल्या आहेत. पोलिसांनी तिघांकडून 2 लाख 50 हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकल जप्त केल्या. या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील तीन आणि भोसरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी सुभाष सावंत, प्रमोद सात्रस, प्रमोद उगले, संकेत घारे, किशोर परदेशी, सचिन शेजाळ, अनिल जगताप, नारायण तेलंग यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.