Dehuroad : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देहूरोड आणि चाकण पोलीस ठाण्यात दोन अपघाताच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात रविवारी (दि. 2) दुपारी झाले आहेत.

अपघाताची पहिली घटना सवाना चौक, देहूरोड येथे दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. या अपघातात ऐश मोहंमद खान (वय 23, रा. चिखली), सौदागर लोंढे (वय 26, रा. चिखली) या दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर दत्तू कांबळे (वय 26, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सत्येंद्र रामसिंग चौधरी (वय 32, रा. रायगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी दुपारी एमएच 46 / बीएफ 6208 या कंटेनरवरील चालक आरोपी सत्येंद्र याने कंटेनर भरधाव वेगात चालवून मयत खान आणि लोंढे यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची दुसरी घटना चाकण-तळेगाव रोडवर महाळुंगे येथील महिंद्रा शोरूमच्या गेटसमोर दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात मन्नू सिंग प्रसाद सिंह (वय 24, रा. महाळुंगे, ता. खेड) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुनेश्वरसिंग टिलकधारी सिंग (वय 27, रा. महाळुंगे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एमएच 46 / बी के 5885 या कारवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत मन्नू सिंह हे तळेगाव-चाकण रोडने पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी कारचालकाने त्याची चार भरधाव वेगात चालवली. महिंद्रा शोरूमच्या गेटसमोर आरोपीने त्याच्या कारने धडक दिली. यामध्ये मन्नू सिंह याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.