Hinjawadi : तडीपार आरोपीला हिंजवडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी एका महिन्यातच जिल्ह्याच्या हद्दीत मिळून आला. हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक करून मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नितीन रामभाऊ अवताडे (वय 32, रा. थेरगाव ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विकी कदम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी शिवाजी चौक बाजारतळ येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी शिवाजी चौक, बाजारतळ चौकात सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी नितीन पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.

आरोपी नितीन हा हिंजवडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर 23 डिसेंबर 2019 रोजी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याला सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, तो शासनाची कोणतीही परवानगी न घेता एकाच महिन्यात पुणे जिल्ह्यात आढळून आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.