Dehuroad: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी सारिका नाईकनवरे बिनविरोध

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी सारिका नाईकनवरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज आला नसल्याने अध्यक्ष ब्रिगेडियर ओ.पी. वैष्णव यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ब्रिगेडियर वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मावळते उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, बोर्ड सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, गोपाळ तंतरपाळे, ललित बालघरे, अॅड. अरुणा पिंजण, प्रभारी कार्यालय अधीक्षक पी.बी. शेलार उपस्थित होते.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची 11 जानेवारी 2015 ला सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भाजपकडून अ‍ॅड. अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, विशाल खंडेलवाल व ललित बालघरे असे चार, काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू व गोपाळराव तंतरपाळे हे दोघे तसेच रघुवीर शेलार यांची निवड झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या उपाध्यक्षपदी सुरुवातीला बालघरे व त्यानंतर पिंजण यांना संधी देण्यात आली. भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत समझोत्याप्रमाणे पिंजण यांनी राजीनामा दिल्यानंतर मागील वर्षी 17 जुलैला झालेल्या बैठकीत खंडेलवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने गुरुवारी (दि.2) खंडेलवाल यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या सारिका नाईकनवरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून विशाल खंडेलवाल तर अनुमोदक म्हणून अरुणा पिंजण यांनी स्वाक्षरी केली होती. उपाध्यक्षपदासाठी सारिका नाईकनवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ.पी. वैष्णव यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.