Dehuroad News : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करा : श्रीजित रमेशन

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलमधील हॉस्पिटल व्यवस्थापन कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना फॅबीफ्लू गोळ्या विकत घेण्यास सांगत आहेत. मात्र, हे औषध गरीब रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे हे औषध मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केली आहे.

या संदर्भात रमेशन यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल व्यवस्थापन कोरोना बाधित रुग्णांना फॅबीफ्लू गोळ्या विकत घेण्यास सांगत असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात आल्या आहे. देहूरोड शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये फॅबीफ्लू उपलब्ध आहे. त्याची किंमत 1500-2500 च्या दरम्यान आहे. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या गरीब रूग्णांना हे महागडे औषध परवडत नाही.

आपत्कालीन परिस्थिती किंवा कमतरता असल्यास औषध विकत घेण्याचे विशेष अधिकार सीईओ आणि इन्सिडेंट कमांडरकडे आहेत. निविदा प्रक्रियेद्वारे ते मिळविण्यासाठी वेळ लागेल. कोविड या सर्व आपत्तीजनक परिस्थितीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभिर्याने पाहावे. गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी फॅबीफ्लू मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी रमेशन यांनी निवेदनात केली आहे.

जिल्हाधिकारी आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्यावतीने फॅबीफ्लू गोळ्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच फॅबीफ्लूचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.