Pune News : ‘ध्यायेती योगिनी’कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित कलासक्त (पुणे) यांच्या ‘ध्यायेती योगिनी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे शनिवारी (दि.20 नोव्हें) सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सांस्कृतिक प्रसार उपक्रमाची माहिती दिली. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०६ वा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमांत अलौकिक उर्जा शक्ती असलेल्या ६४ योगीनींचा नृत्याद्वारे घेतलेला शोध सादर करण्यात आला. ओडीसा मध्ये हिरापूर येथे आणि मध्य प्रदेशात चौसष्ठ योगिनींचे मंदीर आहे. निसर्गातून ऊर्जा घेणाऱ्या या योगिनी गूढ आणि स्वयंभू आहेत.सर्व बंधनातून मुक्तीचा संदेश या योगिनी देतात. अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या योगीनींचे भरत नाट्यम् आणि ओडिसी या दोन्ही नृत्यप्रकारात सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाची संहिता रसिका गुमास्ते यांनी केली होती, तर संगीत मॅजिक नोट स्टुडियो सुद्धा त्यांचेच होते. प्रमद्वरा कित्तूर,रसिका गुमास्ते यांनी निवेदन केले. संदीप चौगुले आणि राधिका देशपांडे यांनी संयोजनात विशेष योगदान दिले.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामूल्य होता. कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळूनच सगळ्यांना प्रवेश दिला गेला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.