Dighi : महापौरांची तत्परता; आगीची माहिती मिळताच दौरा अर्धवट सोडून घटनास्थळी धाव

एमपीसी न्यूज – दिघीतील पोलाईट पॅनोरमा हाईटस्‌ला प्रिंटरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळताच पाहणी दौ-यावर असलेले महापौर राहुल जाधव, स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी दौरा अर्धवट सोडून त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण केले. आग विझविण्याचे कार्य संपेपर्यंत महापौर जाधव घटनास्थळी थांबले. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. महापौर, नगरसेवकांच्या या कार्य तत्परतेचे दिघी परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

दिघीतील पोलाईट पॅनोरमा हाईटस्‌मधील चौथ्या मजल्यावरील एका शॉपमधील प्रिंटरचा स्फोट होऊन आज (सोमवारी)सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. धुरामुळे पुढे कोणालाही जाता येत नव्हते. प्लॉस्टिक जळाल्याने दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, आर्थिक नुकसान झाले आहे.

इमारतीला आगा लागल्याची माहिती स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांना मिळाली. त्याचवेळी महापौर राहुल जाधव यांचा दिघीतील महापालिकेच्या मिळकती पाहणीचा दौरा सुरु होता. आग लागल्याची वार्ता कानावर येताच महापौर जाधव, नगरसेवक डोळस यांनी दौरा अर्धवट सोडून त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण केले. आग विझविण्याचे कार्य संपेपर्यंत महापौर जाधव घटनास्थळी थांबले. त्यांनी घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली. परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले. आग लागल्याची माहिती मिळताच दौरा अर्धवट सोडून आल्याने महापौर, नगरसेवकांच्या या कार्य तत्परतेचे दिघी परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”महापालिकेच्या मिळकतींचा दिघीत पाहणी दौरा सुरु होता. त्याचवेळी स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांना आग लागल्याबाबत फोन आला. त्यानंतर आम्ही त्वरित दौरा अर्थवट सोडून घटनास्थळी धाव घेतली. प्रिंटरचा स्फोट झाल्याने आग लागली होती. अग्निशामक दलाला बोलवून आग आटोक्यात आणली. चौथ्या मजल्यावर आग लागल्याने परिस्थिती गंभीर होती. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कोणीही जखमी झाले नाही. शहरात अशा घटना घडू नयेत यासाठी शहरवासियांनी दक्षता घेण्याचे” आवाहनही त्यांनी केले.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”महापौर राहुल जाधव यांच्यासोबत पाहणी दौरा सुरु असताना अचानक दिघीतील पोलाईट पॅनोरमा इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर महापौर जाधव यांनी त्वरित अग्निशामक दलाच्या अधिका-यांना दूरध्वनी केला. तसेच दौरा अर्थवट सोडून घटनास्थळी धाव घेतली. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही”.

स्थानिक नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे यांनी देखील महापौरांसोबत घटनास्थळी भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.