Dighi News: दिघीकरांचा पाणीपुरवठा होणार सुरळीत, पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – वर्षानुवर्षे सुरळीत आणि व्यवस्थित पाणीपुरवठापासून वंचित राहिलेल्या दिघी आणि लगतच्या भागांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते येथे नवीन पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा, तसेच पंप आणि पंप हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे या भागातच पाण्याची साठवणूक आणि वितरण होणार असून भविष्यातील 24 तास पाणीपुरवठ्याचे नियोजनही करता येणार आहे.

दिघी येथील डोंगर पायथ्याजवळ नवीन पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि.19) पार पडला. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पंप आणि पंप हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नवीन पाण्याच्या टाकीचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले उपमहापौर हिराबाई घुले, ‘ई’ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, नगरसेवक निर्मला गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, संजय गायकवाड, माजी नगरसेवक रामदास कुंभार, आशा सुपे, कुलदीप परांडे, उदय गायकवाड व पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

‘ई’ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस म्हणाले की, ”आमदार महेश लांडगे यांनी व्हिजन 20-20 डोळ्यासमोर ठेवून सुरुवातीलाच सुरळीत पाणीपुरवठापासून नेहमीच वंचित राहिलेल्या दिघीसारख्या भागाला 24 तास पाणीपुरवठा होईल, अशी योजना अमलात आणणार असल्याचे आश्वासन दिले होते ते आज पूर्ण केले आहे. दिघी येथे सद्यस्थितित 20 लक्ष लीटर जुनी उंच पाण्याची टाकी व 8 लक्ष लीटर जुनी लहान टाकी आहे.

सद्यस्थितीत दिघी येथील पुणे आळंदी रस्त्याच्या पुर्व भागाला टाकीतुन व पश्चिम भागाला ममता चौकातून बायपासद्वारे दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. नुकतीच लोकार्पण करण्यात आलेली 20 लक्ष लीटर नविन उंच पाण्याची टाकी आहे. तसेच 15 लक्ष लीटर क्षमतेच्या पंप व पंप हाऊसचे काम सुरू होणार आहे”.

”नजिकच्या भविष्यात 10 महिन्यात सदर 15 लक्ष लीटर क्षमतेचे पंप व पंप हाऊस बांधुन पुर्ण होईल. तसेच सध्या दिघीला भोसरीतून होणारा पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही कमी व्यासाची व कमी क्षमतेची असल्याने एक टाकी भरणेस लागणारा पाच तासांचा वेळ कमी करून साधारणतः अडीच तासात टाकी भरेल. त्यासाठी एमएस ‘नविन पाईपलाईन टाकण्याच्या कामाची निविदा लवकरच काढण्यात येईल. या सर्व कामांमुळे दिघीचा पाणीपुरवठा सुरळीत होऊन 24×7 योजना संपुर्ण दिघीला चालु करणे शक्य होईल”, असेही नगरसेवक डोळस यांनी सांगितले.

पुढच्या 20 वर्षांचा विचार करुन पाण्याचे नियोजन दिघीमध्ये करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला सुरळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न होता तो निकाली लागला आहे. आता आंध्रा, भामा-आसखेड पाणी कोट्यातील पाणीदेखील दिघी साठी उपलब्ध होणार आहे, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी मांडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.