Pimpri News : उत्तम निवेदक होण्यासाठी समृद्ध व्यक्तिमत्व, विचारांची खोली आणि खुसखुशीतपणा हवा – रवींद्र घांगुर्डे

स्व. सतिश दिवाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मैत्रेय संस्थेतर्फे शब्दमैफल पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज – उत्तम निवेदक होण्यासाठी समृद्ध व्यक्तिमत्व, विचारांची खोली आणि खुसखुशीतपणा हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक रवींद्र घांगुर्डे यांनी येथे केले.

प्रसिद्ध निवेदक स्व. सतिश दिवाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मैत्रेय संस्थेतर्फे दिला जाणारा शब्दमैफल पुरस्कार विनया देसाई (2020), विनिता पिंपळखरे (2021), वर्षा जोगळेकर (2022) यांना घांगुर्डे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवडमधील निवेदन क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तीचा सन्मान या वर्षीपासून करण्यात येणार असून श्रीकांत चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी घांगुर्डे बोलत होते. श्रीदत्त मंदिर, श्रीधरनगर, चिंचवड येथे हा कार्यक्रम झाला.

कोव्हिडच्या काळात मागील दोन वर्षींचे शब्दमैफल पुरस्कार प्रदान होऊ शकले नव्हते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2020 पासूनचे शब्दमैफल पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीकांत चौगुले यांनी ब्रह्माच्या उपासकांनी शब्द ब्रह्माच्या उपासकांचा केलेला हा सत्कार आहे, अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले. अद्वैत दिवाण यांनी आभार मानले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मुलाखतकारांची मुलाखत अर्थात शब्दमैफल या कार्यक्रमात विनया देसाई, विनिता पिंपळखरे, वर्षा जोगळेकर यांच्याशी प्रसिद्ध नाट्य अभिनेते अशुतोष नेर्लेकर यांनी संवाद साधला. वर्षा जोगळेकर म्हणाल्या, की मी लहानपणी ‘सुंदर मी होणार’ हे नाटक केले.

लहानपणी आजोबा आम्हाला नाटक पाहायला न्यायचे. काही नाटकांचे मी लागोपाठ प्रयोगही पाहिले आहेत. हुजूरपागा शाळेत असताना मी दरवर्षी नाटकात काम करायचे. कीर्ती शिलेदार यांची नाटकं पाहता पाहता त्यांच्या नाटकात काम करण्याची इच्छा झाली. त्यांच्या नाटकात त्यांच्या सखीच्या भूमिका मी सकारल्या. माहेरी व सासरी आपल्याला प्रोत्साहनच मिळाले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

निवेदकाची भूमिका दुधातील केशरासारखी

आपली वाणी चांगल्या कामासाठी वापरावी या भावनेतून काम करत आले, असे विनया देसाई यांनी सांगितले. आपल्याला एखाद्याच्या आनंदात सहभागी व्हायला मिळण्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. दुधात केशरकाडीसारखी निवेदकाची भूमिका असते. ‘अभ्यासे प्रकट व्हावे नाही तर झाकुनी राहावे’ असा निवेदनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. निवेदन करताना तेच तेच किस्से सांगितले तर लोकांना कंटाळा येईल म्हणून विकसित व्हायला व्हावे. स्वर्गीय सतीश दिवाण यांच्यामुळे लतादीदींपर्यंत पोचून त्यांना गजरा कसा देता आला याचा किस्सा यावेळी त्यांनी सांगितला.

विनिता पिंपळखरे म्हणाल्या, की झलक संस्थेच्या ‘रसिका तुझ्यासाठी’ कार्यक्रमातून 50 गाण्यांचे निवेदन आपण केले. एक जरी प्रेक्षक असला तरी त्याच ताकदीने काम करावे हे आम्हाला शिकवले गेले. वडील राज्य शिक्षण संस्थेचे संचालक असल्याने त्या काळात वा. रा. कांत, बा. भ. बोरकर यांचे कार्यक्रम ऐकायला मिळाले. पु. ल. देशपांडे यांना सूत्रसंचालन करताना मी पाहिले आहे. त्या काळाने मला मोठे ट्रेनिंग दिले. प्रत्यक्ष काम करायला शिकवले.

कार्यक्रमाचे संयोजन नाट्य अभिनेते संजय गोसावी, मंजुश्री दिवाण आणि विशाखा कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.