Bhosari : शिक्षणात सम्राट नव्हे महर्षी, ऋषी म्हणा – गिरीश बापट 

एमपीसी न्यूज – शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. शिक्षण हा पेशा आहे. शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीचे आहे, असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगली संस्कृती असून त्याचे मूळ शिक्षकांपर्यंत जाते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे असून राज्य सरकार सर्वाधिक पैसे शिक्षणावर खर्च करत असल्याचेही ते म्हणाले. 

शिक्षक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने दिले जाणा-या गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण बापट यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आज (गुरुवारी) झालेल्या कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, उषा काळे, राजू बनसोडे, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, सुवर्णा बर्डे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होत्या.

शिक्षकांमुळेच मी या पदापर्यंत पोहचलो असल्याचे सांगत बापट म्हणाले, ‘शिक्षक कधीच पुढारी झाला नाही. शिक्षकाने अनेक नेते घडविले. डॉक्टर, अभियंते, वकिल निर्माण केले. शिक्षक विद्यार्थ्यांना आपली संपत्ती मानतात. शिक्षकांमुळेच आपणाला दिशा मिळते. आई-वडिलांपेक्षा सर्वात जास्त काळ विद्यार्थ्यांचा शिक्षकांसोबत व्यथित होतो. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्याला घडवितात. समाजात शिक्षकांचा आगळ-वेगळ स्थान आहे. शाळा नेहमी आदर्शच असते अन् शिक्षक हा गुणवंतच असतो, त्याचे दुसरे नाव गुणवंत आहे. शाळा ही सोन्याच्या खाणीसारखी शिक्षणाची खाण आहे. या खाणीतून विद्यार्थी निर्माण होत असतात’.

‘शिक्षणातून मानसाला विद्या मिळते. विद्येतून संस्कार होतात. संस्कारातून तो सुसंस्कृत होते आणि अशा सुंस्कृत लोकातून समाजाची संस्कृती निर्माण होते. भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगली संस्कृती आहे. त्याचे मूळ शिक्षकांपर्यंत जाते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे असे सांगत’ बापट म्हणाले, ‘मानसाचे पगारावर मुल्यपान ठरत नाही. शिक्षणावर त्याचे मुल्यमापन ठरविले जाते. शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले असून राज्य सरकार शिक्षणावर सर्वांत जास्त म्हणजेच 42 हजार कोटी रुपये खर्च करत होते. आता त्यामध्ये वाढ केली असून 50 कोटी खर्च केला आहे’.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘शिक्षक गुणवंत कसा ठरवायचा हा मोठा प्रश्नच आहे, कारण प्रत्येक शिक्षक हा गुणवंतच असतो. गुरु हे श्रेष्ठच असतात. शिक्षक समाजाबरोबर राहतो. प्रत्येक घटकाला बरोबर घेतो. महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी महापालिका शाळेतून निर्माण व्हावेत. तसेच गुणवंत शिक्षकांची निवड करण्यासाठीच्या समितीत तज्ज्ञांची निवड करावी’, अशी सूचनाही त्यांनी केली. आज 69 शिक्षकांना पुरस्कार मिळाला असून पुरस्कार न मिळालेल्या शिक्षकांनी आमच्यावर राग धरु नये, असेही ते म्हणाले.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. पालिकेच्या शाळेत या नगरीतील कष्टक-यांची मुले शिकतात. पालिका शाळेतील मुलांचा माध्यमातून शहराचे नाव व्हावे. शाळांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सर्व सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात दिल्या जाणार आहेत. सर्व मागण्या पुर्ण केल्या जातील. मागण्या पुर्ण केल्यानंतर शिक्षकांडून शाळांचा दर्जा सुधारुन घेतलाच जाईल. तसेच यंदा सर्व शिक्षकांना पुरस्कार दिला आहे. पुढील वर्षी गुणांवरच पुरस्कार दिला जाईल. अर्जांवर पुरस्कार दिला जाणार नाही’, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगत सभापती सोनाली गव्हाणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.