Bhosari : ‘व्हायरल’मुळे शिक्षणमंत्री अनुउपस्थित तर खासदार, आमदारांची दांडी!

भोसरीत शिक्षक पुरस्कारांचे वितरण 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त महापालिका शाळेतील गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांचे पुरस्कार शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्याचा अट्टाहास सत्ताधा-यांनी केला. शिक्षकदिनादिवशी मंत्री साहेबांची वेळ मिळाली नसल्याने त्या दिवशी पुरस्कार प्रदान केले नाहीत. मंत्र्यांच्या वेळेनुसार आज पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले खरे परंतु, ‘व्हायरल’ इन्फेक्शनमुळे  शिक्षणमंत्री विनोद तावडे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. तर, शहरातील खासदार, दोन आमदारांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. 

भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पालिका शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहान देण्यासाठी गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार केला जातो. या पुरस्कारांचे वितरण शिक्षकदिनादिवशीच केले जात होते. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून त्यामध्ये खंड पडत आहे.

यंदा सत्ताधा-यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार करण्याचा हट्टास केला.  शिक्षकदिनादिवशी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी तावडे यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे सत्ताधा-यांनी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लांबणीवर टाकला. तावडे यांच्या वेळेनुसार आज कार्यक्रमाचे आयोजन केले खरे  तथापि, ‘व्हायरल’ असल्यामुळे तावडे आजही कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. त्यांच्या संदेशाची ‘चित्रफीत’ कार्यक्रमस्थळी दाखविण्यात आली. शिक्षणमंत्री तावडे आले नसल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भोसरीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, भोसरीचे आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते.

तर, खासदार, दोन  आमदारांनी देखील कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. तर, आयुक्त श्रावण हर्डीकर कार्यक्रमाच्या शेवटी हजर झाले. कार्यक्रमाला तब्बल दीडतास उशिर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले होते. कार्यक्रमाचे अत्यंत ढिसाळ नियोजन होते. पत्रकारांना देखील बसण्यासाठी जागा नव्हती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.