Pimpri : पालखी मार्गावरील खड्डे बुजवा, आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी पिंपरी (Pimpri) महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सेवा सुविधामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळा स्वागताचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशा सूचना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी अधिका-यांना दिल्या.

Alandi : निर्जला एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलसजावट

जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा आणि मुक्कामाच्या स्थळाची पाहणी आयुक्त सिंह यांनी केली. पालखी मार्गाची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बाबासाहेब गलबले, मनोज सेठीया, प्रमोद ओंभासे, संजय खाबडे, ज्ञानेश्वर जुंधारे कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, अजय सुर्यवंशी, थॉमस नरोन्हा, दिलीप धुमाळ, वासुदेव मांढरे, बापू गायकवाड, नितीन देशमुख, महेश कावळे, उप आयुक्त रविकिरण घोडके, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आदी उपस्थित होते.

स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी आपसात समन्वय ठेवून पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी पूर्ण करावी. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था ठेवावी असे निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी संबंधितांना दिले.

पालखी मार्गाची सुरुवात निगडी येथील भक्ती शक्ती येथून करण्यात येते. याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारला जातो. येथे करण्यात येणा-या व्यवस्थेबद्दलची माहिती आयुक्त सिंह यांनी घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदीरामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम असतो.

या ठिकाणची पाहणी देखील आयुक्त सिंह यांनी केली. आकुर्डी येथील अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय, वसंतदादा पाटील प्राथमिक शाळा येथे दिंड्यांचा मुक्काम असतो. या शाळांची पाहणी देखील आयुक्त सिंह यांनी केली. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात यावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी सिंह यांनी केली. तसेच, इंद्रायणी नदीमधील जलपर्णी काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने आळंदी येथे सुरु आहे. याठिकाणची पाहणी देखील त्यांनी केली. आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.