मराठी चित्रपट ‘वेलकम होम’… वास्तवाचे चित्रण

एमपीसी न्यूज- घर म्हणजे वास्तू, चार भिंती, वरती छप्पर, समोर अंगण, गैलरी, किंवा असेच काही, पण हि रचना म्हणजे खरोखरीचे घर आहे का ? त्या घरामध्ये मायेचा, जिव्हाळ्याचा, प्रेमाचा ओलावा असला तर त्याला घरपण येते, पण असे घरपण जरी असले तरी पुरुषांच्या बरोबर स्त्री ला हक्काचे, तिच्या हक्काचे घर मिळणार आहे का ? विषय गंभीर असला तरी वास्तवाशी साधर्म्य साधणारा आहे. बाईचे घर नेमक कोणते ? ह्याच्या शोधाची कथा “ वेलकम होम “ मध्ये मांडली आहे.

ही कथा एक कुटुंब वत्सल, सुशिक्षित गृहिणी असलेल्या डॉ सौदामिनी भोवती फिरते, तिचे लग्न झालेले असून सदानंद नावाचा तिचा नवरा हा सी ए असून तो आपल्या कामात सतत व्यग्र असतो, त्यांच्या लग्नाला बारा वर्षे झाली, त्यांना एक मुलगी आणि सदानंद यांची माई असे ते रहात असतात. पण सदानंद आणि सौदामिनीचे काही पटत नाही. आणि एक दिवस ती घर सोडून ती आपल्या माहेरी मुली आणि माई यांना घेवून निघून येते. अचानक ती माहेरी आलेली बघून सर्वाना धक्काच बसतो, तिची विचारपूस करतात त्यावेळी कळते कि डॉ सौदामिनी आपले घर सोडून कायमची माहेरी आलेली आहे. सौदामिनी च्या माहेरी तिचे आई-बाबा “ विमल आणि अप्पासाहेब जोशी “ , तिची लहान बहिण मधुमती, आणि येऊन जावून ताई मावशी असे असतात, सदानंदचा मित्र सुरेश मसुरकर हा सुद्धा सौदामिनीचा मित्र असतो.

सौदामिनी घर सोडून माहेरी येते आणि कथेला सुरवात होते. माहेरच्या प्रत्येकाच्या मनांत विविध प्रश्नांचे काहूर माजते, नवऱ्याचे घर सोडून मुलगी प्रथम माहेरी येते, माहेरची माणसे हि तिचीच असतात, पण त्यांना सुद्धा काही बंधने असतात. अश्या अवस्थेत मुलगी घरी आलेली आहे त्यावेळी समाज कोणत्या दृष्टीकोनाने ह्या घटने कडे पाहील ह्याची काळजी त्यांना असतेच. अश्या वेळी सौदामिनीच्या मनांत असंख्य विचार येतात, पारंपारिक रूढी प्रमाणे मुलगी लग्न करून एकदा नवऱ्याच्या घरी गेली कि ते घर तिचे होते, तिने त्या घराला आपले मानायला हवे, पण तसे आज वास्तवात होते का ? सौदामिनीच्या जीवनात काय उलथापालथ झाली, तिला तिच्या माहेरी कशी वागणूक मिळते ? तिची बहीण – तिची मावशी, आई-बाबा, आणि तिचा मित्र सुरेश कश्या पद्धतीने तिच्याशी वागतात, शेवटी तिचा परदेशात असलेला भाऊ तिला नेमके काय सांगतो. अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत त्या बंधनात सिनेमाची कथा रंगवली असून ह्या प्रश्नांची उत्तरे बघताना एक विचार हा सिनेमा देऊन जातो आणि तो विचार आपणाला अंतर्मुख करायला लावतो.

जुन्या काळात जे मुलीवर अन्याय झाले ते आता होऊ नयेत ह्यावर सिनेमा भाष्य करतो. सौदामिनीची मुलगी तिला म्हणजे आपल्या आईला विचारते “ कि तुझ्या आईचे घर जर तुला तुझे वाटत नाही तर मग माझे पुढे घर कोणते होणार किंवा असणार आहे ?“ आजच्या वास्तवावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.

या सिनेमातील सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. सौदामिनीची भूमिका मृणाल कुलकर्णी हिने केली असून नवऱ्याला सोडून घरी – माहेरी आल्यानंतरच्या भावनांचा, मनाचा मानसिक कल्लोळ छान दाखवला आहे. डॉ मोहन आगाशे यांचा अप्पासाहेब जोशी आणि उत्तरा बावकर यांनी साकारलेली विमल सौदामिनीची आईची भूमिका लक्षांत रहाते. सौदामिनीची बहीण मधुमतीची भूमिका स्पृहा जोशी हिने छान सादर केली आहे. सुरेशची भूमिका सुमित राघवनने अत्यंत संयमाने केली आहे.

सेवा चौहानची माईची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेते. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केलेल्या दिग्दर्शनाने कथा हळू – हळू उलगडत जाते तशी ती प्रेक्षकांची पकड घ्यायला सुरवात करते. सिनेमाची गती सिनेमात मांडलेल्या मानसिक भाव-भावनांना हाताळत उत्तम ठेवली आहे. त्यामुळे शेवटी योग्य तो परिणाम चित्रपट साधतो.

सिनेमाची कथा ही संवेदनशील असून, मनाला हळू-हळू भिडत जाते. आजची स्त्री गृहिणी आहे, नोकरी करणारी आहे, नोकरीत शिक्षणात तिने आपले एक स्थान निर्माण केले आहे. तिचे नाव सर्वत्र असले तरी सुद्धा तिच्या नावावर “ घर “ नाही. घरपण आहे पण स्वतःचे घर नाही. सिनेमात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा भिन्न-भिन्न स्वभावाच्या असल्या तरी त्या एका अनामिक धाग्यांनी एकत्र अश्या विणलेल्या आहेत. विषय आजचा – वास्तवातला आहे, स्त्री – पुरुष समानता ह्यावर सिनेमा भाष्य करताना तो आपणाला विचारपूर्वक अंतर्मुख करतो.

चित्रपटाची निर्मिती लाइव्ह पिक्चर्स ह्या चित्रपट संस्थेने केली असून निर्माते अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवणी, दीपक कुमार भगत हे आहेत. कथा – पटकथा – संवाद सुमित्रा भावे यांचे असून दिग्दर्शन सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांचे लाभले आहे. छायाचित्रण धनंजय कुलकर्णी, संकलन मोहित टाकळकर, गीते सुनील सुकथनकर, संगीत पार्थ उमराणी यांचे असून यामध्ये मृणाल कुलकर्णी, डॉ मोहन आगाशे, सुमित राघवन, उत्तरा बावकर, स्पृहा जोशी, दीपा श्रीराम, सिद्धार्थ मेनन, सेवा चौहान, सारंग साठे, प्रांजली श्रीकांत, सुबोध भावे असे कलाकार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.