फत्तेशिकस्त सिनेमा …एक देखणा सर्जिकल स्ट्राईक

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- एक दर्जेदार अभंग सुरु आहे एका देवळात….. महाराज मोहिमेवर गेलेत अन जिजाबाई अन सोयराबाई आणि छोटा संभाजी ,त्या अभंगात तल्लीन झाल्या आहेत … बाळराजे मध्येच आऊसाहेबांना “राजे कधी येणार ?”असा प्रश्न विचारतात … आऊ साहेबांच्या डोळ्यात त्या प्रश्नाने आणि राजांच्या काळजीने चिंतेचे अश्रू येतात … त्या तरी ही स्वतःवर ताबा मिळवत सोयराबाई न कडे बघतात … त्यांच्या ही चेहेऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते त्यावेळी त्यांची व्याकूळता लपली जात नाही … आणि अचानक …. त्या चाललेल्या नितळ अभंगाशेवटी तिथे छत्रपती शिवाजी महाराज वादळाच्या वेगाने दाखल होतात … अत्यंत रोमांचकारी प्रसंगाने फत्तेशिकस्त चित्रपटाची सुरवात होते …

महाराज वेढा पडलेला असताना कसे तेथून परत आले, त्यात बाजीप्रभू देशपांडे यांची त्यांना समर्थ साथ मिळाली आणि आपला एक मोलाचा शिलेदार गमवावा लागल्याचे शल्य महाराजांच्या ओठी येते आणि त्यावर आऊसाहेबांचे स्तब्ध होणे, म्हणजे मानवी भावभावनांचा झालेला आत्मसाक्षात्कार. याचा शोध घेत हा चित्रपट पुढे जात राहतो …

स्वराज्यातील मोलाचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि त्यांचा साथीदार किस्ना यांच्या करामती आपल्याला त्या काळातील जोखमीची अन अन्यायाचीबित्तंबातमी देत असतात … खरंच महाराजांचे एक -एक शिलेदार म्हणजे कोहिनुर हिराच जणू … त्यांचं कार्य दाखवायचे म्हणजे खायचे काम निश्चितच नाही … दिगपाल लांजेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रयत्नांची शिकस्त केलेली जाणवते … पहिल्या भागात थोडासा रेंगाळणारा चित्रपट नंतर मात्र वेग पकडतो … वाड्यातली लढाई, त्याच्या आधीची पूर्वतयारी यात वेग जरूर आहे पण काही ठिकाणी उगाचच घाई केल्यासारखी वाटते …

_MPC_DIR_MPU_II

शाहिस्तेखानाला शिकस्त दिल्यावर मुघलांना दिलेला गुंगारा, खरतर ज्यांनी याची रसभरीत आणि आकर्षक वर्णन वाचलेली अथवा ऐकलेली आहेत त्यांना अगदीच ते प्रसंग उरकल्यासारखे वाटतात … खरतर शेवट हा अगदीच रोमहर्षक करता आला असता. पण तो परिणाम साधता साधता राहूनच गेला …

कथेमध्ये बाकीच्या शिलेदारांचे वर्णन करता करता जे छत्रपतींचे बुद्धिचातुर्य दिसायला हवे होते ,ते कुठे तरी झाकोळले जाते आहे की काय ? अशी भीती निर्माण होते … पण छत्रपतींचे कार्य इतकंही तोकडे नाही की ते असे सहज झाकोळले जाईल … शेवटचे विजयी गीत मात्र जमून आले आहे ..’रणी फडकती लाखो झेंडे’ हे गीत खूपच प्रेरणादायी झाले आहे … एकूणच गाणी सगळीच लक्षात राहण्यासारखी झाली आहेत.

सगळ्यांची कामे वाखाण्यासारखी झाली आहेत … छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका संयत पण अधिक उठावदारपणे झाली असती तरी चालले असते. संयत अभिनयातून जो बुध्दीचातुर्याचा आविष्कार झाला असता तो अधिक प्रभावी झाला असता असे वाटते …

एकूणच जमून आलेली फिल्म … आणि यातून खरच प्रेरणा घेण्यासारखी आहे … यांची मोहीम मात्र फत्ते झालेली आहे हे चित्रपट संपल्यावर लगेच लक्षात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.