Pimpri : सीमा सावळे, बाळासाहेब ओव्हाळ तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्येच

विभागीय आयुक्तांकडे केली नाही तक्रार

एमपीसी न्यूज – पक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने नगरसेविका सीमा सावळे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली असली. तरी, विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली नाही. त्यामुळे दोघेही तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्येच असून महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या उमेदवारालाच मतदान करावे लागणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या विरोधात नगरसेविका सीमा सावळे यांनी बंडखोरी केली होती. पक्षादेश डावलल्याने 12 ऑक्टोबर रोजी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. तर, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरीतून मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांची 10 ऑक्टोबर रोजी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सावळे आणि ओव्हाळ यांच्या नगरसेवकपदावर कारवाई करण्यासाठी महापालिकेतील सत्तारुढ पक्षाच्या गटनेत्याने विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणे अपेक्षित होते. पक्षविरोधी कारवाई केल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असते. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये तक्रार करणे आवश्यक असते. परंतु, भाजपने सावळे आणि ओव्हाळ यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या दोघेही भाजपमध्येच आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या उमेदवारालाच मतदान करावे लागणार आहे.

महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, “नगरसेविका सीमा सावळे आणि नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची विभागाकडे भाजप नगरसेवक अशीच नोंद आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.