Film review The Kerala story : द केरला स्टोरी एका वैश्विक आतंकवादाचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज-दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शहा निर्मित ‘द केरला स्टोरी ‘ हा चित्रपट म्हणजे एक ( Film review The Kerala story) अंधारातलं ज्वलनशील धगधगतं वास्तव आहे. आजपर्यंत ज्या विषयाची चर्चा समाजातील काही घटकांमध्ये अगदी गुप्तपणे व्हायची तीच चर्चा आणि तोच विषय या चित्रपटात दाखवला गेला आहे. समाजातील सुसंस्कारित मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यात आपल्याला हवे तसे वैचारिक, शारीरिक आणि मानसिक बदल घडवून आणून त्यांना धार्मिक चक्रव्युहात गुरफटून टाकायचं आणि त्यांचा सर्वांगाने छळ करायचा, आणि अशी परिस्थिती निर्माण करायची की या छळातून त्या आणि त्यांचे कुटुंब कधी बाहेरच येऊ शकले नाही पाहिजे आणि मुख्य म्हणजे हा छळ त्यांच्या जीवावरच बेतला पाहिजे.

हा असला नतद्रष्ट खेळ हा कायमच खेळला गेला आहे. चित्रकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत काही हजारो मुलींच्या बाबतीत ही गोष्ट वास्तवात घडली आहे. या आतंकवादाची भीषणता इतकी जास्त आहे की, या पालकांकडे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कागदी पुरावेच नाही आहेत आणि त्या मुली आपली खरी ओळख शोधण्यासाठी धडपडत आहेत . जागतिक कायद्यानुसार त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या आहेत. फक्त एक चूक ते म्हणजे सर्वस्व देऊन प्रेम करणं आणि त्यात गुरफटत जाण, हेच त्यांना या दुष्टचक्रात घेऊन जातं. त्यांच्यासाठी सगळे दरवाजे बंद झालेले असतात. त्यांचं नावही त्यांचं राहिलेलं नसतं. आपली स्वतःची ओळखच पुसली गेलेली असते. अशावेळी आरोपी बनून नाहक जीव गमावणं किंवा पकडले गेल्यास सगळं खरं काय ते सांगून टाकणं एवढेच हातात असतं. त्यात पण आपल्या ओळखीचे पुरावे नसल्यामुळे आयुष्यभर सडत राहणं एवढेच हाती राहिलेले.

आयसिसचे अतिरेकी म्हणून लागलेला शिक्का आणि दुसरीकडे होत असलेला पश्चात्ताप, आणि त्यातून घरच्यांसाठी आपले असलेलं बेपत्तापण यातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजेच “द केरला स्टोरी”. दिग्दर्शक सुदीप्तो  सेन आणि निर्माता विपुल अमृतलाल शहा यांनी सर्वप्रथम या विषयाला हात घातला आणि वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे सर्वात पहिल्यांदा कौतुक केलं पाहिजे. सगळीकडेच थोड्या बहुत प्रमाणात या गोष्टी होत आहेत. हे वास्तव आहे, हे हळूहळू आता माध्यमांमध्ये येत आहे. हा आपल्या मूलभूत जगण्याच्या पद्धतीवर घातला गेलेला घाव आहे आणि तो घाव, आणि ती जखम कोणीतरी डोळसपणे दाखवणे गरजेचे होते.  इथे हे दाखवल्याबद्दल चित्रपटकर्त्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळतात.

आता अभिनयाबद्दल थोडेसे

अभिनेत्री अदा शर्मा हिने शालिनी उन्नीकृष्णन ही मुख्य भूमिका अतिशय उत्तम साकारली आहे. काही सीन्स मध्ये तिचे केरळी उच्चारण मात्र थोडेसे खटकते. तरीही या सगळ्या मर्यादा असून सुद्धा तिने अत्यंत समरस होऊन ही भूमिका साकारल्याचे जाणवते. विशेष उल्लेख अभिनेत्री देवदर्शिनी चेतन यांनी शालिनीचीआई ही भूमिका कमाल साकारली आहे. म्हणजे चित्रपट बघताना प्रत्येकाला त्या आपल्या घरातीलच एक सदस्य वाटतात.

त्यांनी भूमिकेतील प्रत्येक छटा अत्यंत सूक्ष्मपणे आणि संयतपणे चेहऱ्यावर दाखवल्या आहेत. सगळ्यांच्याच भूमिका चांगल्या झाल्या आहेत. संजय शर्मा यांनी संकलन चांगले केले आहे. काही सीन्स मध्ये थोडा वेग चालला असता. प्रसंतु मोहापात्रा यांच्या कॅमेरात चित्रपट छान चित्रित झाला आहे. विशेषतः अफगाणिस्तान, सीरिया मधील प्रसंग चित्रपटाची भव्यता दाखवतात. सूर्य पाल सिंग, सुदीप्तो सेन, आणि विपुल अमृतलाल शहा यांनी चित्रपट चांगला लिहिला आहे.

सर्वात शेवटी जेव्हा  या घटनेतील खरे साक्षीदार आणि केरळ मधील खऱ्या अर्थाने असलेले पिडीत यांच्या मुलाखती सुरू होतात तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते. ती दाहकता ऐकल्यावर असे प्रसंग आपल्याही आयुष्यात येऊ शकतात म्हणून आपण सावध राहणं गरजेचं आहे. बाकी काही नाही हाच उपदेश मनात साठवून आपण थिएटर बाहेर पडतो. अत्यंत सुंन्न करणारा हा अनुभव आहे. पण तरीही हा अनुभव घेणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडू नये. कुठल्याही अर्थी आपण आतंकवादाला बळी पडू नये यासाठीच आपण प्रत्येकाने थिएटर मध्ये जाऊनच हा चित्रपट पाहायला हवा ( Film review The Kerala story) इतकेच.

 लेखक: हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.