Gharkul Yojana Lottery: महापालिकेतर्फे सदनिकांची सोडत, 84 लाभार्थ्यांना हक्काचे घर

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्रमांक 17 व 19 चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. शिल्लक इमारतींमधील एकूण 84 लाभार्थ्यांना सदनिकांचे आज (मंगळवारी) संगणकीय सोडतीनुसार वाटप करण्यात आले आहे. (Gharkul Yojana lottery) या पात्र लाभार्थ्यांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसह अंध, दिव्यांग, महिलांचाही समावेश आहे. 

चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन कार्यालयामध्ये आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते सदनिकांची संगणकीय सोडत पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सक्षम प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, महापालिका कर्मचारी यांच्यासह सदनिका लाभार्थी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना महापालिकेच्या वतीने चांगले घर उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून स्वत:च्या हक्काच्या घराचे  स्वप्न प्रत्यक्ष साकार होणे हा आनंदाचा क्षण आहे. शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत राहील.(Gharkul Yojana Lottery) पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना पुढील काळात चांगले घर उपलब्ध करुन देण्यासाठी सदनिका दिल्या जातील. या सदनिकांमध्ये महापालिकेने सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.

 

सदनिकांच्या सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मुलभूत सुविधांसह घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील.  लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या सदनिकांचा सुयोग्य वापर करणे गरजेचे आहे.  आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.  या ठिकाणी शांतता ठेवण्या बरोबरच तेथे स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.  त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी , असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका, केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने प्राधिकरण सेक्टर क्रमांक 17 आणि 19 चिखली येथे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील बांधण्यात आलेल्या इमारतींमधील बँक कर्ज मंजूर झालेल्या व रोख रक्कम जमा केलेल्या लाभार्थींना आजपर्यंत झालेल्या 23 संगणक सोडतीनुसार 143 इमारतींमधील 6006 सदनिकांचे  वाटप यापूर्वी करण्यात आले  आहे. शिल्लक इमारतींमधील एकूण 84 लाभार्थ्यांना सदनिकांचे आज संगणकीय सोडतीनुसार वाटप करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.