TDR : ‘टीडीआर प्रकरणी नगररचनाचे उपसंचालक यांना ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार द्या’

संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे उपरोधिक मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा (TDR) वाकडमधील टीडीआर घोटाळा नुकताच उघडकीस आला. या घोटाळ्यामुळे महापालिकेचे तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर यामुळे महानगरपालिकेची राज्यात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या कथित भ्रष्टाचारामुळे नगररचनाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांचा मनमानी कारभार संपूर्ण शहराने पाहिला. येत्या काळात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारा सोबतच शासनाच्या वतीने ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार देखील सुरू करण्यात यावा आणि त्या पुरस्काराची सुरुवात गायकवाड यांच्या पासून करण्यात यावी, अशी उपरोधिक मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केली आहे.

काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणे चालतात.आणि त्याच नगररचना विभागात उपसंचालक पदावर प्रसाद गायकवाड यांची नियुक्ती होते. (TDR) नगररचना विभागाच्या अखत्यारीत येणा-या अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. त्यांच्या नियुक्तीपासून ते आजपर्यंतच्या कालावधीमधील प्रकरणात त्यांनी पदाचा व अधिकाराचा सर्रासपणे गैरवापर केला आहे.

त्यांनी नगररचना विभागात रुजू झाल्यापासून शुल्लक कारणावरून, सांगितलेले नियमबाह्य कामे न केल्याने कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्यात तर अनेक कर्मचाऱ्यांना मेमो दिले आहेत. गायकवाड यांनी केलेले अजून दोन मोठे भ्रष्टाचार आम्ही येत्या काळात पुराव्यासहित उघड करणार आहोत, असा इशारा काळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.