Dehugaon News : तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचविण्यासाठी ‘सप्तरंगी’ आहार द्या – डॉ. किशोर यादव

एमपीसी न्यूज : “कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. मुलांना परिपूर्ण आहार, फळे (सप्तरंगी) खायला द्यावा. तसेच न्युमोनिया होऊ नये, यासाठीची लहान मुलांना न्यूमोकोकल लस टोचून घ्यावी”,  असे आवाहन देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी पालकांना केले.

सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने कोरोनाच्या या संकटकाळात पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी, ‘कोरोना : दंतकथा आणि वास्तव’ या विषयावर डॉ. किशोर यादव यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विठ्ठल-रुख्मिणी ट्रस्ट, पंढरपूरचे विश्वस्त व देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे, डॉ. भरत कानगुडे, सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, माजी उपसरपंच सचिन कुंभार, बिभीषण खोसे, तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्रा. सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या महामारीत देहूगाव कोविड सेंटरच्या माध्यमातून अहोरात्र रुग्णांची सेवा केल्याबद्दल डॉ. यादव यांचा शाळेच्या वतीने ‘सन्मानचिन्ह’ देऊन विशेष गौरव करण्यात आला. देहू, देहूरोड व मावळ विभागातील विविध वृत्तपत्रांचे वार्ताहरांचा कोविड योद्धा म्हणून पत्रकार राजेंद्र काळोखे, रामकुमार अगरवाल, मंगेश पांडे, संदीप भेगडे, प्रभाकर तुमकर, महादेव वाघमारे, प्रकाश यादव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

डॉ. यादव पुढे म्हणाले “कोरोना झाल्यानंतर न्युमोनियाही होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे रूग्ण गंभीर होतो. तथापि पालकांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना न्युमोनिया होऊ नये, यासाठीची मुलांना न्यूमोकोकल लस टोचून घ्यावी’. देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध होणार असून एक वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही लसीचे तीन डोस मोफत आहेत. यासाठी पालकांनी नावनोंदणी करावी. तसेच पुढील वयोगटातील मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन खासगीमध्ये ही लस देता येईल. एक डोसची किंमत 5 हजार रुपये असे 15 हजार रुपयांचे तीन डोस देणे आवश्यक आहे. मुलांना परिपूर्ण आहार, फळे (सप्तरंगी) खायला द्यावा. मुलांचे नियमित लसीकरण करावे, त्यांची शारीरिक हालचाल गरजेची आहे.”

कोरोनाची लक्षणे जाणवल्या नंतर अनेक जण दुखणे अंगावर काढतात. लक्षणे जाणवताच घरगुती प्रयोग न करता फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा. कुटुंबातील एक सदस्य पाॅझिटीव्ह आल्यानंतर इतरांनी तात्काळ चाचणी करून घ्यावी, असे सांगून डॉ. यादव म्हणाले योग्य वेळी उपचार करून रूग्ण बरा होता. मात्र, अती आत्मविश्वासामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावले आहे. त्यामुळे कोरोनाच होऊ नये म्हणून प्रत्येकाने एसएमएस म्हणजे सोशल डिस्टेंसिंग, मास्क आणि सॅनिटाइजर या तीन गोष्टींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

प्रास्ताविक प्राचार्या कविता अय्यर यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी तर आभार सहशिक्षिका प्रियंका नागरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.