Nigdi News: ‘मराठवाड्यातील शेतकर्‍यांना सरसकट पीक विमा लागू करुन भरपाई द्यावी’, अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – मराठवाड्यात यंदा वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्के अधिकचा पाऊस झाल्याने खरीपाच्या क्षेत्रावरील पीके पूर्णपणे वाहून गेली असून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारकडे उपग्रहाद्वारे नुकसानीची माहिती घेण्याची यंत्रणा उपलब्ध असल्याने नुकसानीच्या पंचनाम्यात वेळ न घालवता सरसकट खरीपाच्या क्षेत्रावरील पिकांना कंपनीने विमा लागू करुन नुकसान भरपाई द्यावी असे आदेश केंद्र सरकारने कृषी विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे राज्यसंघटक गोविंद घोळवे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी पुणे येथे शिवसेनेचे राज्य संघटक आणि श्री क्षेत्र भगवानगडाचे सचिव गोविंद घोळवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत घोळवे यांनी लेखी निवेदन देऊन केंद्र सरकारने कृषी विमा कंपनीला शेतकर्‍यांना सरसकट पीक विमा लागू करुन नुकसान भरपाई द्यावी यासाठी आग्रह धरला.

मराठवाडा हा अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने वर्षानुवर्ष कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर्षी मात्र पहिल्यांदाच पन्नास वर्षात झाला नाही इतका पाऊस आठच दिवसात झाला. पावसाने सर्व विक्रम मोडून सरासरीच्या पन्नास टक्के अधिक नोंद केली.

तर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकर्‍यांच्या तोंडाला आलेल्या पिकाचा घास पाण्यात वाहून गेला. पीके पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला. तर जायकवाडी, मांजरा, माजलगाव, विष्णुपुरी या मोठ्या धरणांसह मराठवाड्यातील बहुतांशी प्रकल्प भरल्याने नदीपात्रामध्ये पाणी सोडावे लागले.

धरणाच्या पाण्याच्या वेगाने गोदावरीसह, मांजरा, सिंदफना, कुंडलिका यासह बहुतांशी नदी काठच्या जमिनी खरडून वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेंतर्गत विमा कंपन्या नुकसानीचे पंचनामे आणि प्रशासनाच्या पैसेवारीवर पीक विमा लागू करुन नुकसान भरपाई देतात.

मागच्या वर्षीपासून शेतकर्‍यांनी 72 तासाच नुकसानीची तक्रार पुराव्यासह विमा कंपनीच्या ऑनलाईन अ‍ॅपवर देण्याच्या सुचना आहेत. मागच्या वर्षी ज्या शेतकर्‍यांनी कंपनीच्या वेळेत नुकसानीची तक्रार केली नाही. त्यांना नुकसान भरपाई दिली नाही. यावर्षी पावसाने सर्वत्रच नुकसान केले असल्यामुळे आणि शासनाकडे उपग्रहाद्वारे नुकसानीची माहिती घेण्याची यंत्रणा असल्यामुळे पंचनाम्यांच्या आणि पैसेवारीचे कागदी घोडे नाचवत वेळ घालवू नये.

तात्काळ सरसकट कृषी विमा कंपनीने मराठवाड्यातील सर्व शेतकर्‍यांना विमा लागू करुन नुकसान भरपाई द्यावी असे आदेश केंद्र सरकारने कंपनीला द्यावेत. तसेच पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या तालुकानिहाय शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी देखील मागणी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे घोळवे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.