Hadapsar: अतिदक्षता विभागातील कोरोना रुग्ण महिलेच्या विनयभंग प्रकरणी वॉर्डबॉयला अटक

0

एमपीसी न्यूज – अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग प्रकरणी पुण्यातील हडपसरच्या एका खासगी रुग्णालयातील वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली आहे. 

या प्रकरणी 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अशोक नामदेव गवळी (वय 40, रा.नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) या वॉर्डबॉय विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोरोनाबाधित असून त्यांच्यावर हडपसरमधील एका नामांकित रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता एक पीपीई किट घातलेली व्यक्ती फिर्यादीच्या बेडजवळ आला.  त्याने त्याच्या चेहऱ्यावरील मास्क खाली घेऊन आपल्याला ओळखले का, असा प्रश्न फिर्यादीस विचारला. त्यावेळी फिर्यादीने ओळखले नाही असे सांगितले. तेव्हा त्याने फिर्यादीच्या जवळ येऊन त्यांच्या मनास उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

या प्रकारामुळे घाबरुन रुग्ण महिलेने आरोपीला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे आलेल्या एका मुलीने “अशोक, तू येथे काय करतोस,” अशी विचारणा केली. तेव्हा, आरोपी तेथून निघून गेला. फिर्यादीने घडलेला प्रकार त्यांचे कुटुंबीय व डॉक्टरांना सांगितला.

संबंधीत व्यक्ती हा रुग्णालयात काम करणारा वॉर्डबॉय असल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर त्यास तत्काळ अटक करण्यात आली.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. ढावरे करीत आहेत.

पोलिसांनी पीपीई किट घालून नोंदवली फिर्याद 

हडपसर पोलिसांना रात्री या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयात जाऊन पीपीई किट घालून महिलेची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like