Hinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार

एमपीसी न्यूज – ठाणे येथील एका डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीला पुण्यात चांगली नोकरी लावण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. हा प्रकार जून 2019 ते 28 ऑगस्ट 2020 या कालावधीत हिंजवडी येथे घडला.

शिवा अमरनाथ दुबे (वय 25, रा. नोराटीवस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कळंबोली ठाणे येथील एका डान्सबार मध्ये काम करत होती. तिथे आरोपी दुबे जात होता. डान्सबार मध्ये दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर दुबे याने तरुणीला ‘ तू डान्सबार मध्ये काम करू नकोस. मी तुला पुण्यातील चांगल्या कंपनीत काम लावतो’ असे सांगितले.

त्यावर विश्वास ठेऊन तरुणी दुबेसोबत पुण्यात आली. तरुणीला दुबे याने हिंजवडी येथे एका ठिकाणी भाड्याची खोली घेऊन ठेवले. दुबे फिर्यादी तरुणीच्या खोलीवर येऊन तिच्याकडे वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होता. त्यास तरुणीने नकार दिला असता त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.

पुण्यात तरुणीला काम न मिळाल्याने तरुणी पुन्हा मुंबईला राहण्यास गेली. आरोपी दुबे याने तिथे जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तरुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तिथून हा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.