Hinjawadi : सेकंड हॅन्ड कार खरेदीच्या बहाण्याने अभियंत्याची दोन लाखांची फसवणूक

Engineer cheated Rs 2 lakh under the pretext of buying a second hand car

एमपीसी न्यूज – सेकंड हॅन्ड कार खरेदी करून देतो, तसेच त्या कारला काही नवीन पार्ट टाकून देतो, असे आमिष दाखवून अभियंत्यांकडून एक लाख 91 हजार 500 रुपये घेतले. पैसे घेऊन चार महिने उलटल्यानंतरही कार खरेदी करून न दिल्याने अभियंत्याने फसवणुकीची फिर्याद दिली आहे. ही घटना 16 डिसेंबर 2019 ते 19 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली आहे.

गगनदीप सुधीर तलवार (वय 28, रा. हिंजवडी. मूळ रा. राणीबाग, नवी दिल्ली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अर्णव चव्हाण (रा. वाघोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. आरोपी अर्णव याने फिर्यादी तलवार यांच्याशी ओळख करून मैत्री केली.

तलवार यांचा विश्वास संपादन करून एमएच 12 / इएक्स 1143 ही होंडा सिव्हिक कार खरेदी करून देतो आणि या कारला नवीन पार्ट टाकून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने एक लाख 92 हजार रुपये रक्कम मागितली.

तलवार यांनी 16 डिसेंबर 2019 ते 19 फेब्रुवारी 2020 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून आरोपीच्या खात्यावर एक लाख 91 हजार 500 रुपये ट्रान्स्फर केले.

पैसे मिळाल्यानंतर चार महिने उलटून देखील अर्णव याने फिर्यादी यांना कार खरेदी करून दिली नाही. याबाबत तलवार यांनी फसवणुकीचा फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.