Pune : पुणे – पिंपरी चिंचवड दौऱ्यात देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेना टार्गेट

Shiv Sena target by Devendra Fadnavis in Pune-Pimpri Chinchwad tour

एमपीसी न्यूज – कोरोनाचे निमित्त करून पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील रुग्णालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. मात्र, यादरम्यान त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

यावेळी दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार स्थापन झाले असते, याचा फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केल्याचे त्यांना अद्यापही रुचले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

आपण पुन्हा मुख्यमंत्री झालो नसल्याची सलच एक प्रकारे त्यांनी पुण्यात बोलून दाखविली. तसेच आमच्या सर्वोच्च नेत्यांना राष्ट्रवादी सोबत शिवसेना पण हवी असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना संदर्भात त्यांनी फार काही उपाययोजना सुचविल्या नाहीत. त्यामुळे फडणवीस यांच्या राजकीय टोलेबाजीचीच जास्त चर्चा रंगली. राज्य शासनाने महापालिकांना आर्थिक मदत केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

या दौऱ्यात प्रामुख्याने त्यांनी शिवसेनेलाच टार्गेट केल्याचे दिसून आले. ज्या प्रकारे या सरकारचा कारभार सुरू आहे. ते कधी कोसळणार आम्हाला सांगावे लागणार नाही, असे सांगून ठाकरे सरकार स्थिर नसल्याचेही त्यांनी सुचविले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र्रातील जनतेने शिवसेना – भाजप युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षाचे बिनसले.

त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादीला जवळ करून सत्ता स्थापन केली. त्याची सल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे.

आगामी काळात कोरोना, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आशा मुद्यांवरून भाजपने ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.