Pune : पुढील 13 दिवस कसे भागवायचे; सर्वसामान्य पुणेकरांना सतावतेय चिंता

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून आता 27 दिवसांचा कालावधी होत आला आहे. तर 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन चालणार आहे. त्यामुळे पुढील 13 दिवस कसे भागवायचे, असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे.

हाताला काम नाही, महिनाभर घरात राहिल्याने होते नव्हते ते आता संपले आहे. त्यामुळे आता कोणाच्या पुढे हात पसरायचे, अशी चिंता गोरगरीब पुणेकरांना सतावू लागली आहे. पैसे कुठून आण्याचे, रोजची गुजराण कशी करायची, असे यक्ष प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील अर्थकारणच कोलमडले आहे. रोजच रुग्ण वाढत असल्याने हे संकट सध्या तरी आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. 3 मे नंतर तरी पुण्यातील व्यवहार सुरळीत होणार का, अशी विचारणा होत आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य पुणेकरांचीच लूट होत आहे. किराणा, भाजीपाला, दूध, औषधे अशा सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे या जीवनावश्य्क वस्तू खरेदीसाठी आता पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस बाहेर जाऊ देत नाही. विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला आशा सर्वांनाच या संकटाचा सामना करावा लागत आहे.

पुण्यात शेकडो कामगार अडकले आहेत. त्यांना गावाला जाण्याची इच्छा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांचे हाल होत आहे. पुण्यात रोज कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू होत असल्याने गावांकडील नातेवाईक सातत्याने विचारणा करीत आहेत. ‘शहरांपेक्षा आपला गाव बरा’, अशी म्हणण्याची पाळी कामगारांवर आली आहे. लवकरच शेतीची कामे सुरू होणार असल्याने गावाला जायला मिळणार का, याची उत्सुकता कामगारांना लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.