Talegaon Dabhade News : मुख्याधिकाऱ्यांचे फर्मान; अनधिकृत नळ कनेक्शन येत्या 15 दिवसात अधिकृत न केल्यास होणार फौजदारी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात सुमारे पाच हजार अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. या नळ कनेक्शन धारकांनी येत्या 15 दिवसात दंडात्मक रक्कम भरून ते नळजोड अधिकृत न केल्यास त्या मालमत्ताधारकावर नगर परिषदेची जलवाहिनी फोडणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अशी माहिती तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली आहे.

अनधिकृत नळजोड घेऊन पाणी वापरणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाईची मोहीम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. मागील गेले दहा ते पंधरा वर्षात साधारणतः पाच हजारपेक्षा जास्त अनधिकृत नळजोड झाले असल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे, काही अनधिकृत नळजोड हे मुख्यजलवाहिनीला जोडलेले असल्यामुळे अधिकृत नळजोड धारकांना कमी दाबाने पाणी मिळते; तसेच नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्न बुडणे, पाणी पुरवठ्यात विस्कळीतपणा येणे, पाईपलाईन गळतीचे प्रमाण वाढणे या सारख्या समस्या निर्माण होत आहेत.

यापुढे एकही अनधिकृत नळजोड सुरू राहणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी दिघे यांनी सांगितले. यापुढे सुरुवातीला अनधिकृत नळजोड धारकांना त्याचे अनधिकृत नळजोड नियमित करण्याची एक अंतिम संधी दिली जाणार आहे. पुढील पंधरा दिवसांच्या कालावधीत संबंधितांना नगर परिषदेत येऊन दंड, डिपॉझिट व पाणीपट्टी भरून त्यांचे अनधिकृत नळजोड नियमित करून घ्यावे लागणार आहे.

या कालावधीत जे अनधिकृत नळजोड धारक आपले नळजोड अधिकृत करणार नाहीत असे नळजोड नगरपरिषदेद्वारे विखंडित करण्यात येईल. त्यांच्यावर नगरपरिषदेचे पाणी चोरी करणे, पाईप लाईन फोडणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे फर्मान मुख्याधिकारी दिघे यांनी काढले आहे.

त्यामुळे अनधिकृत नळजोड धारकांना कारवाई नको असेल आणि पाणीपुरवठा सुरू ठेवायचा असेल तर त्यांचे नळजोड दंडाची निर्धारित रक्कम भरून नियमित केल्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही. अनधिकृत नळजोड तोडताना व संबंधितावर फौजदारी कारवाई करताना कोणताही दबाव हस्तक्षेप झाला तरी देखील सदर कारवाई थांबवली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी सतीश दिघे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.