PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातील महत्त्वाच्या अपडेट्स

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर सकाळी पावणे अकरा वाजता आगमन झाले. पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन झाले, यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वतः तिकीट काढून मेट्रोने प्रवास देखील केला. पुणे महानगरपालिकेतील चर्चीत सिंहासनरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींची पुणे भेट पुणेकरांसाठी मात्र सर्वार्थाने लक्षवेधी ठरली. 

असा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा

लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने ते कृषी महाविद्यालय येथे आले. तिथून पंतप्रधान मोदी यांनी पुणे महापालिका भवन येथे भेट दिली. महापालिकेत प्रथम महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला. यावेळी उपरणे, फेटा आणि शिवप्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी काहींना पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. हा कार्यक्रम आटपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या उदघाटनासाठी रवाना झाले.

सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरवारे मेट्रो स्थानकात आगमन झाले. त्यांनी 12.2 किलोमीटर अंतरावरील मेट्रोचे उदघाटन केले. फुगेवाडी ते पीसीएमसी आणि वनाज ते गरवारे या दोन मार्गावरील मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी – चिंचवड महापौर उषा ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेट्रो स्थानकावरील मेट्रो प्रकल्पाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचे उदघाटन करून त्याची माहिती मोदींनी जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी माहिती दिली. दरम्यान मेट्रो स्थानकावरील सुविधांची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल माध्यमातून मेट्रोचे तिकीट घेतले. तिकीट घेतल्यानंतर ते मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर दाखल झाले. तिथे मेट्रोच्या अधिका-यांना नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तिकीट दाखवले.

मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. गरवारे ते आनंदनगर मेट्रो स्थानक दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रो प्रवासादरम्यान यांनी दिव्यांग प्रवाशांसोबत संवाद साधला.  पावणे बारा वाजता मेट्रो गरवारे स्थानकातून निघाली.

गरवारे मेट्रो स्थानकावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो प्रवासाबाबत अभिप्राय नोंदवला आणि ते एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणा-या सभेसाठी रवाना झाले.

दुपारी 12.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. त्यावेळी उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनावर जल्लोष केला. 12.10 वाजता पंतप्रधान मोदी यांचे मंचावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थितांनी ‘मोदी, मोदी’ असा जल्लोष केला.

जिरेटोप, तलवार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले  तसेच कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर, महापौर माई ढोरे, जपान, फ्रांस देशाचे राजदूत आदी उपस्थित होते.

एमआयटी कॉलेज येथे मुळा मुठा नदीशुद्धीकरण, सुशोभीकरण प्रकल्प, ई बस डेपो, आर के लक्ष्मण आर्ट गॅलरी अशा पाच कामांचे उदघाटन करण्यात आले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ आणि आर के लक्ष्मण यांच्या स्नुषा यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी पुण्याचे स्वातंत्र्यलढ्यातील स्थान महत्त्वाचे आहे असा पुण्याचा गौरव केला. विविध उपक्रमांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.

कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला रवाना झाले, हा कार्यक्रम पार पडताच पंतप्रधान मोदींचे नवी दिल्लीसाठी प्रस्थान होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.